Bhiwandi Building Collapsed: भिवंडी इमारत दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम ठेकेदार कोण होते, याचाही शोध सुरू आहे

Bhiwandi Building Collapsed

भिवंडी (Bhiwandi)  तालुक्यातील वळपाडा येथील इमारत कोसळल्याच्या (Bhiwandi Building Collapse) दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत नऊ जण जखमी झाले  आहे. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेकजण अजूनही अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. तर जखमींवर  शासकीय खर्चात उपचार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी झालेल्यांची भेटही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

शनिवारी दुपारी 1.45 च्या सुमारास ही घटना घडली. वळपाडा येथील कैलासनगर परिसरात वर्धमान कंपाऊंड परिसरात इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एम.आर.के. फुडचे गोदाम आणि कार्यालय होते. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सदनिका होत्या. या ठिकाणी काही भाडेकरू कुटुंबे राहत होती. दोन मजल्यापर्यंत स्लॅबचे बांधकाम तर, तिसऱ्या मजल्यावर पत्रे बसविण्यात आलेले होते. यावेळी या इमारतीचा 70 टक्के भाग कोसळला.

इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम ठेकेदार कोण होते, याचाही शोध सुरू आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली. इमारतीचा ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. या इमारतीवर मोठा मोबाइल टॉवर होता. तसेच पत्र्याच्या खोल्यांचे वाढीव बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीवर भार वाढून ती कोसळण्याची शक्यता आहे.