Ban on Nylon Manja: मकर संक्रांतीच्या आधी मुंबईमध्ये नायलॉन मांजावर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

मुंबई शहरात, विशेषत: मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 30 दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे 12 जानेवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत, प्लास्टिक किंवा अशा कोणत्याही सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या पक्क्या धाग्यांच्या वापरावर, विक्रीवर आणि साठवणीवर बंदी घालण्यात आली आहे.

Kite Flying (Photo Credits: Twitter)

याआधी अनेकवेळा पतंग उडवताना (Kite Flying) नायलॉनच्या मांजामुळे (Nylon Manja) लोक जखमी झाल्याचे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी मकर संक्रांत (Makar Sankranti 2023) सणाच्या आधी शहरात पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केले आहेत. विशाल ठाकूर, डीसीपी, ऑपरेशन्स, मुंबई पोलीस यांनी हा आदेश जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी पतंग उडवण्याच्या उत्सवादरम्यान, प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक पदार्थापासून बनवलेल्या पक्क्या धाग्यामुळे- ज्याला सामान्यतः नायलॉन मांजा म्हणतात, लोक आणि पक्ष्यांना दुखापत होते.

म्हणूनच, नायलॉन किंवा प्लास्टिक किंवा सिंथेटिक धाग्यापासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या धाग्याच्या घातक परिणामांपासून लोक आणि पक्ष्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आदेशात पुढेही म्हटले आहे की, ‘हे नायलॉनचे धागे, पतंगांसोबत जमिनीवरच राहतात. अशा जैवविघटनशील नसलेल्या प्लास्टिकच्या पदार्थांचे आयुष्य जास्त असल्याने ते मातीत तसेच राहिल्याने पर्यावरणाला हानी पोहोचू शकते.’

या धाग्यांचे गटारांच्या लाईन, ड्रेनेज लाईन, नद्या, नाले यांसारखे नैसर्गिक जलमार्ग, माती आणि जलमार्गावर विपरित परिणाम होतात. गुरेढोरे, गायी आणि इतर जनावरे जमिनीवरील अशा धाग्यांचे सेवन करतात, ज्याचा त्यांच्यावरही परिणाम होतो. या आदेशात पुढे म्हटले आहे की, जैव-विघटनशील नसलेल्या अशा कृत्रिम धाग्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने अनेकदा वीजवाहिन्या आणि सबस्टेशनवर फ्लॅश-ओव्हर होतो, ज्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो.

म्हणूनच असे धागे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन/प्लास्टिकमुळे मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आता अशा प्रकारच्या नायलॉन/प्लास्टिकच्या धाग्यांवर एक महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. ‘हा एक नित्याचा आदेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मकर संक्रांतीवेळी शहरात अनेक ठिकाणी पतंग महोत्सव भारतात. यावेळी घराघरात तसेच कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते. परंतु यादरम्यान दिवसेंदिवस नामशेष होत असलेल्या दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजाती म्हणून वर्गीकृत असलेल्या पक्ष्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Mumbai: बृहन्मुंबई क्षेत्रात 31 जानेवारीपर्यंत फटाके वाजविण्यास मनाई, जाणून घ्या कारण)

मुंबई शहरात, विशेषत: मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 30 दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे 12 जानेवारी 2023 ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत, प्लास्टिक किंवा अशा कोणत्याही सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या पक्क्या धाग्यांच्या वापरावर, विक्रीवर आणि साठवणीवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 12 जानेवारी 00.01 तासांपासून 10/02/2023 च्या 24.00 वाजेपर्यंत मागे घेतल्याशिवाय अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत शिक्षेस पात्र असेल.