बच्चू कडू यांचे आंदोलन मागे; सरकारने मागण्या मान्य न केल्यास 2 ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

बच्चू कडू यांच्याकडून सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 2 ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Bacchu Kadu | X@RealBacchuKadu

शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या मागणींसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी उपोषण संपवलं आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी यावेळी अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंत यांच्या घराबाहेत आंदोलन करू असं बच्चू कडू म्हणाले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काल बच्चू कडूंची आंदोलन स्थळी भेट घेतली होती.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी 15 जूनला राज्यभरात रास्तारोको आंदोलन केले जाणार होते. हे आंदोलन देखील मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आत उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी 30 जून रोजी विशेष बैठक घेण्याचे आणि याबाबत अधिकृत पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे.

आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस होता. अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. आज सकाळी त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, असं अमरावतीचे तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement