मुंबई वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी दोषी अहमद अली कुरेशी याला जन्मठेप: मुंबई सत्र न्यायालय
मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी, 28 फेब्रुवारी रोजी मुंबई वाहतूक पोलीस विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या हत्येप्रकरणी अहमद अली कुरेशी याला दोषी घोषित केले आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी, 28 फेब्रुवारी रोजी मुंबई वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी अहमद अली कुरेशी याला दोषी घोषित केले आहे. 23 ऑगस्ट 2016 रोजी खार येथे कुरेशी याच्याकडून शिंदेंची हत्या करण्यात आली होती हे सिद्ध होताच आज, शनिवारी या दोषींना जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कुरेशी सोबतच त्याच्या दोन अन्य साथीदारांवरील आरोप सुद्धा कोर्टाने मान्य केले आहेत. मुंबई पोलीस हवालदार विलास शिंदे यांनी कर्तव्यावर असताना भरधाव गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली ज्यावरून रागाच्या भरात या मुलाने आपला मोठा भाऊ कुरेशी याला बोलावून घेतले आणि सर्वांनी शिंदे यांच्यावर बांबूने हल्ला केला. यामध्ये जबर मारहाण झाल्याने शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची अवस्था बिघडून 31 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी ही कारवाई पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
ANI ट्वीट
प्राप्त माहितीनुसार, विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांच्या तक्रारीनुसार, 2016 मध्ये 23 ऑगस्ट रोजी शिंदे एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपाजवळ ड्युटीवर होते. दुपारी 3.15 च्या सुमारास, हेल्मेट न घातल्याबद्दल त्यांनी 17 वर्षीय मुलाची बाईक थांबवली. मुलगा अल्पवयीन असल्याने मागितली आणि कुटुंबातील प्रौढ व्यक्तीला बोलावून घेण्यास सांगितले तोपर्यंत त्यांनी त्याच्या गाडीची चावी जप्त केली. यावेळी अल्पवयीन मुलाने कुरेशी म्हणजेच आपल्या मोठ्या भावाला बोलवले. कुरेशी घटनास्थळी पोहचताच त्याने शिंदे यांच्या डोक्यावर बांबूने हल्ला केला. शिंदे जमिनीवर पडल्यानंतर कुरेशी यांनी त्याला मारहाण केली आणि खिशातून चावी बाहेर काढली, आणि घटनास्थळावरून दुचाकी घेऊन पळ काढला.
दरम्यान, या हल्ल्यात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर फ्रॅक्चर झाला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले ,शिंदे यांच्या निधनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात कायदा अधिक कठोर केला होता.ऑक्टोबर 2016 मध्ये खार पोलिसांनी 700 पानांचे आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्रात 50 ते 60 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.या अल्पवयीन आरोपीविरोधात सत्र न्यायालयात खटलाही सुरू आहे आणि गुन्ह्याच्या गंभीरतेमुळे किशोर न्यायालयीन परवानगी घेऊन त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालविला जात आहे.