ऑनलाइन खेळांविषयी मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांना सल्ला
आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये मुलांमध्ये ऑनलाइन खेळ खेळणे हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. कारण असे खेळ मुलांना वेगवेगळी आव्हाने देवून त्यांची पूर्तता करण्यासाठी उत्तेजित करतात. यामुळे मुलांना या खेळाचे व्यसन लागण्याची जास्त शक्यता आहे.
आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये मुलांमध्ये ऑनलाइन खेळ खेळणे हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. कारण असे खेळ मुलांना वेगवेगळी आव्हाने देवून त्यांची पूर्तता करण्यासाठी उत्तेजित करतात. यामुळे मुलांना या खेळाचे व्यसन लागण्याची जास्त शक्यता आहे. ऑनलाइन खेळ एकतर इंटरनेट किंवा इतर संगणकाच्या मदतीने खेळले जातात. पीसी, कन्सोल आणि मोबाइल यासारख्या साधनांच्या माध्यमातून ऑनलाइन गेम खेळले जावू शकतात. तसेच यासाठी फोन अथवा टॅब्लेटचा वापर केला जावू शकतो. या साधनांच्या वापराचे आणि त्यावर गेम खेळण्याचे व्यसन लागणे आता मुलांमध्ये सामान्य गोष्ट झाली आहे. कारण मुलांना कुठेही आणि कधीही सहजतेने खेळ उपलब्ध होवू शकतात. यामुळे त्यांच्या शालेय आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळामुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांचा मोबाइल आणि इंटरनेटचा वापरही वाढला आहे.
तथापि ऑनलाइन खेळांमुळे मुलांना अनेक प्रकारचे तोटे होत आहेत. ऑनलाइन गेमिंग हे मुलांचे गंभीर व्यसन बनते आहे. त्यालाच ‘गेमिंग डिसऑर्डर’ असे संबोधले जात आहे. अशा खेळाची रचना विशिष्ट प्रकारची असते. आधीच्या स्तरापेक्षा नवीन, पुढचा टप्पा अधिक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा बनविण्यात आलेला असतो. यामुळे खेळामध्ये पुढचा टप्पा गाठून जास्त अंक, प्राप्त करण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले जाते. या खेळामध्ये जिंकण्यासाठी मुले स्वतःच्या मर्यादेपेक्षाही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत राहतात. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतात तसेच कोणतीही मर्यादा नसते, त्यामुळे मुलांना या खेळांचे व्यसन लागते आणि अखेरीस मुले ‘गेमिंग डिसऑर्डर’च्या आजाराचे शिकार होतात. खेळ तयार करणा-या कंपन्या मुलांच्या भावनांचा विचार करून त्याप्रमाणेच खेळांची रचना करतात आणि मुलांना खेळांच्या पुढचे टप्पे खरेदी करण्यासाठी भाग पाडतात. तसेच या खेळांचे अॅप खरेदी करण्याची जवळपास सक्तीच करतात.
या सर्व गोष्टींचा विचार करून आणि मुलांमध्ये ऑनलाइन खेळांचे वाढते व्यसन लक्षात घेवून, शिक्षण मंत्रालयाने पालक तसेच शिक्षकांसाठी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. या शिफारसींचा उपयोग मुलांमध्ये निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी होणार आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या इतर परिणामांवर मात करण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी नेमके काय करावे, हे समजणे सोपे जाणार आहे.
हे करू नये:-
1. पालकांच्या परवानगीशिवाय गेममध्ये सांगण्यात आलेली खरेदी करण्यास अनुमती देवू नये. अॅप खरेदी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ‘ओटीपी’आधारित पेमेंट पद्धतीचा अवलंब करण्यात यावा.
2. सबस्क्रिप्शनसाठी अॅप्सवर क्रेडिट/ डेबिट कार्डाची नोंदणी करणे टाळावे. तसेच प्रत्येक व्यवहारासाठी निश्चित खर्चाची कमाल मर्यादा ठेवावी.
3. गेम खेळण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या लॅपटॉप अथवा मोबाइलवरून मुलांना थेट खरेदी करण्याची परवानगी देवू नये.
4. अज्ञात वेबसाइटवरून सॉफ्टवेअर आणि गेम्स डाउनलोड करू देवू नये.
5. वेबसाइटसवर येणा-या लिंक्स, इमेज आणि पॉप-अप्सवर क्लिक करण्यापासून सावध राहण्यास सांगणे. कारण यामधून व्हायरसचा शिरकाव होवून संगणकाला हानी पोहोचू शकते. तसेच अशा लिंक्समध्ये मुलांच्या वयाला अयोग्य असणारी सामुग्री दिलेली असू शकते.
6. कोणताही गेम डाउनलोड करताना इंटरनेटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नये, असा सल्ला द्यावा.
7. मुलांनी गेममध्ये आणि गेमिंग प्रोफाइलवर असलेल्या लोकांबरोबर कोणतीही वैयक्तिक माहिती कधीही सामायिक करू नये.
8. मुलांना वेब कॅमे-यासमोर कोणत्याही प्रकारे खाजगी संदेश किंवा ऑनलाइन चॅटव्दारे कुणाही अनोळखी व्यक्तींना आणि अगदी प्रौढांनाही माहिती देवू नये. यामुळे ऑनलाइन गैरवर्तन करणा-यांकडून संपर्क साधून किंवा इतर खेळाडूंच्या माध्यमातून धमकावण्याचा, बळजबरी करण्याचा धोका असतो.
9. गेमिंगमुळे आरोग्याला हानी पोहोचत असल्याचे समजावून सांगावे तसेच विश्रांती न घेता दीर्घकाळ सतत गेममध्ये गुंतून राहू नये, असे सल्ला देण्यात यावा.
हे करावे:-
1. ऑनलाइन गेम खेळताना जर काही गडबड झाल्याचे लक्षात आले, चूक झाल्याचे लक्षात आले तर लगेच खेळ थांबवा. आणि स्क्रिनशॉट घेवून ठेवा. (कीबोर्डवर ‘प्रिंट स्क्रीन’चे बटण यासाठी वापरावे) आणि या गडबडीविषयी तक्रार करावी.
2. तुमच्या मुलाविषयी गोपनीयता ठेवली जावी, त्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांना मदत करा. त्यांना यासाठी स्क्रीननाव वापरण्यास सांगावे. मुलाचे खरे नाव उघड केले जावू नये.
3. अँटीव्हायरस /स्पायवेअर प्रोग्रॅम वापरण्यात यावा आणि फायरवॉल वापरून वेब ब्राउझरचे सुरक्षित कॉन्फिगरेशन करणे.
4. डिव्हाइसवर अथवा अॅप किंवा ब्राउझरमध्ये पालकांचे नियंत्रण आणि सुरक्षा वैशिष्ट्ये सक्रिय करण्यात यावीत. त्यामुळे काही विशिष्ट सामुग्रीचा प्रवेश प्रतिबंधित करणे शक्य होते आणि गेममधील खरेदीवर खर्चही मर्यादित करण्यासाठी मदत होते.
5. एखाद्या अनोळखी व्यक्तीने अयोग्य गोष्टींविषयी संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न केला अथवा त्या व्यक्तीने वैयक्तिक माहितीची विचारणा केली तर त्याची नोंद घेवून तशी सूचना करा.
6. तुमचा मुलगा/मुलगी खेळत असलेल्या कोणत्याही गेमचे वयाचे रेटिंग तपासून घ्या.
7. जर कोणी जबरदस्ती करीत असेल, धाकदपटशा दाखवत असेल तर त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, हेे मुलांना वारंवार सांगा. तसेच जर त्रासदायक संदेश येत असतील तर त्यांची नोंद ठेवून त्या व्यक्तीच्या अशिष्ट वर्तनाची तक्रार संबंधित गेम साइटच्या प्रशासकाकडे करा. त्या व्यक्तीला ब्लॉक करून टाका. त्या व्यक्तीला त्यांच्या खेळाडूंच्या सूचीतून म्यूट करा किंवा ‘अनफ्रेंड’ करा. अथवा गेममधील चॅट कार्य बंद करा.
8. मुले गेममध्ये कसे खेळतात, त्यांची वैयक्तिक माहितीसंबंधी काळजी घेतात का, तसेच मुले कोणाशी संवाद साधतात, हे अधिक चांगले जाणून घेण्यासाठी तुम्हीच मुलांच्या बरोबर ती खेळताना थांबा.
9. ऑनलाइन गेममध्ये केवळ तुमचा पैसा खर्च व्हावा, म्हणजेच तुम्हाला खर्च करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काही वैशिष्ट्यांचा वापर केलेला असतो. तो एकप्रकारचा जुगारच असतो. त्यामुळे आपण भुलून जायचे नाही, हे आपल्या मुलांना व्यवस्थित समजावून सांगा. ऑनलाइन- आभासी जग आणि प्रत्यक्ष जग यांच्यामध्ये फरक असून त्याच्या परिणामाविषयी मुलांबरोबर बोला.
10. आपली मुले परिवारासाठी असलेल्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करीत असल्याची नेहमी खात्री करून घ्या.
याबाबतीत सतत जागरूक रहा, डोळे उघडे ठेवा.
1. मुले असामान्य, गुप्तपणे काही वर्तन करीत असतील, त्यांच्या ऑनलाइन क्रियाकलापांशी संबंधित काही वेगळे करीत असतील तर लक्ष ठेवा.
2. मुले ऑनलाइन खूप वेळ बसायला लागले, विशेषतः समाज माध्यमासाठी ते जास्त वेळ अचानक घालवित असतील तर सावध व्हा.
3. त्यांना बोलावल्यानंतर त्यांच्या डिव्हाइसवरील स्क्रिन बदलत असतील तर लक्ष द्या.
4. इंटरनेट वापरल्यानंतर किंवा मजकूर, संदेश पाठवल्यानंतर ते माघार घेतात ंिकंवा रागावतात का हे पहा.
5. त्यांच्या डिव्हाइसमध्ये अचानक बरेच नवीन फोन नंबर आणि ईमेल संपर्क आले आहेत का पहावे.
6. घरामध्ये इंटरनेट गेटवे स्थापित करावा. त्यामध्ये मुले प्रवेश करू शकतात, अशा सामुग्रीचे निरीक्षण, लॉगिंग आणि नियंत्रण यासारखी वैशिष्ट्ये असावीत.
7. विद्यार्थ्यांला मिळणा-या गुणांमध्ये घसरण झाली असेल आणि त्याचे सामाजिक वर्तन यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
8. विद्यार्थ्याचे वर्तन संशयास्पद अथवा चिंताजनक आहे असे शिक्षकांना वाटले, किंवा एखादी गोष्ट नजरेस आली तर त्याविषयी शाळेच्या अधिका-यांना कळवावे.
9. इंटरनेटचे फायदे आणि तोटे यांच्याविषयी शिक्षकांनी वारंवार मुलांना सांगावे. हे माध्यम किती संवेदनशील आहे, याविषयी मुलांबरोबर चर्चा जरूर करावी.
10. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेब ब्राउझर आणि वेब अप्लिकेशन यांच्या सुरक्षित कॉन्फिगरेशनचे प्रशिक्षण द्यावे.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर त्याची तक्रार करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करण्यात यावा.
राष्ट्रीय मदत वाहिनी –
https://cybercrime.gov.in/Webform/Helpline.aspx
राज्यनिहाय नोडल अधिकारी –
https://cybercrime.gov.in/Webform/Crime_NodalGrivanceList.aspx
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)