अमरावती: नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस मधून 8 लाखांसह 3 तोळे सोनं जप्त; एकास अटक

आरोपी कुरिअरचं काम करत असल्याची माहिती समोर येत असली तरी ही रोकड नेमकी कशासाठी मुंबईला आणली जात होती, याचा तपास सुरु आहे.

Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

राज्यासह देशभरात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. मात्र याचदरम्यान नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमधून आठ लाख रुपये आणि तीन तोळे सोने सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मंगळवारी (26 मार्च) रात्री 8:30 च्या दरम्यान विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एक व्यक्ती 3 बॅगा घेऊन बसला होता. उमेश सूर्यवंशी असे या व्यक्तीचे नाव असून त्याने वर्ध्यापासून आपला प्रवास सुरु केला होता. संशयामुळे वर्धा पुलगाव दरम्यान उमेश यांच्याकडील बॅगा तपासण्यात आल्या तेव्हा त्यात 8 लाख 10 हजार रुपयांसह 3 तोळे सोने सापडले. त्यानंतर बडनेरा रेल्वे स्टेशन येताच रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी सोने, रोकड जप्त करत आरोपीला ताब्यात घेतलं.

उमेश सूर्यवंशी हा कुरीअरचं काम करत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. मात्र ही रक्कम आणि सोने मुंबईला नेण्यामागचं कारण त्याने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. बडनेरा पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

तसंच गुरुवारी (28 मार्च) रात्री 8:30 च्या सुमारास अकोला टी-पॉईंटवर कारमधून 4 लाख 2 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड अकोल्यातील बांधकाम कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कार आणि रोकड जप्त केली असून निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना संशय उत्पन्न करत आहेत.