International Call Centre Case: मुंबईत बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात तिघांना अटक तर 33 जणांना IPC अंतर्गत बजावली नोटिस
बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचा नवा प्रकार सुरु होता. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे ही साखळी तुटली आहे.
सध्या मुंबईत दिवसागणिक नवनवीन घडामोडी ऐकायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत केस, ड्रग्ज रॅकेट यांसारखी अनेक प्रकरणे समोर येत असताना आता बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर (International Call Centre Case) प्रकरण समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात 3 जणांना अटक केली आहे. तसेच अवैधरित्या कॉल सेंटरमध्ये काम करणा-या 33 जणांना IPC आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे. यात 6 महिलांचा समावेश आहे. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचा नवा प्रकार सुरु होता. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे ही साखळी तुटली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालविण्याचे एक मोठं रॅकेटच समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी हे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्ती अमेरिका (US) आणि कॅनेडियन (Canadian) नागरिकांना लक्ष्य करत होत्या. बेकायदेशीर कॉल सेंटरचे आंतरराष्ट्रीय रॅकेट (International Racket) चालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांना डिटेक्शन क्राइम ब्रांचच्या (Detection Crime Branch) विशेष पथकाने (Special Team) अटक केली आहे. त्यात आता आणखी एक प्रकरण समोर येत असून हा कॉल सेंटर चालविणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. Coronavirus: कार्यालयात 50 % पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या भायंदर येथील कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांची कारवाई
यापूर्वी दिल्लीमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर चालवणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली होती. आरिफ अब्दुल रशीद (24) आणि सुजहुद सुहेलहुद (25) अशी या दोघांची नावं असून ते दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असणाऱ्या शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. आरोपी उच्च पगाराच्या नोकऱ्या ऑफर करत होते. मात्र ऑफर लेटर आणि इतर फॉर्मालिटीज पूर्ण करण्यासाठी पैसे मागत असतं. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या महिलेला आरोपींनी नोकरी देतो असे सांगून 40,000 चा गंडा घातला होता.