Mira Road Crime: मीरा रोड हाणामारी प्रकरणी 13 जणांना अटक; कठोर कारवाई करण्याचे सरकारचे निर्देश

यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Arrest | (Representative Image)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मीरारोडच्या नयानगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाहा ट्विट -

फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यात त्यांनी, या भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेतल्याचे सांगत, सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच, आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.

नया नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हल्लेखोरांविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.