Extramarital Relationships: नात्यामधील Sex च्या कमीमुळे भारतीय विवाहित महिला घेत आहेत एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपचा आधार; कोरोनाकाळात वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ
एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपच्या वापरामध्ये बंगळूर शहर आघाडीवर आहे. ग्लीडेन समुदायाच्या एकूण वापरकर्त्यांपैकी बंगलोरचा वाटा 16.2 टक्के आहे
भारतामध्ये विवाहबाह्य संबंध (Extramarital Relationships) हा नेहमीच एक कायद्याच्या चाकोरीमधील आणि नैतिक मुद्दा राहिला आहे, परंतु अनेकदा नियम हे पुरुष आणि स्त्रियांसाठी भिन्न असतात. काही काळापूर्वीपर्यंत, भारतातील पुरुष आपल्या बायकोच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल पत्नी व त्या पुरुषावर खटला चालवू शकत होते. परंतु अडल्ट्री कायदा संपल्यानंतर आता हे असे होऊ शकत नाही. याच पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये आढळले आहे की, भारतात स्त्रिया जास्त प्रमाणात विवाहबाह्य संबंध ठेवत आहे व त्यापैकी बहुतेक महिला या माता आहेत. फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप 'ग्लीडेन’ (Gleeden) द्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
हे अॅप एका महिलेने महिलांसाठी विकसित केले आहे. हे खास अशा स्त्रियांसाठी बनविले गेले आहे, ज्या महिला त्यांच्या संसारात आनंदी नाहीत आणि त्यामुळे त्या सुख, प्रेम, मैत्री, शारीरिक संबंध बाहेर शोधत आहेत. या अॅपचे सध्या भारतात 1.3 दशलक्ष वापरकर्ते आहेत. कोरोना काळात वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावरून दिसून येते की भारतीय महिला त्यांच्या पतीसोबत आनंदी नाहीत.
या सर्वेक्षणात भारतातील 30-60 वयोगटातील शहरी, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिलांचा दृष्टिकोन दर्शविला गेला आहे. यामध्ये 48 टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळून आले. महत्वाचे म्हणजे त्या फक्त विवाहीतच नव्हत्या तर त्यांना मुलेदेखील आहेत. द न्यू इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या सर्वेक्षणानुसार, 64 टक्के स्त्रिया शारीरिक संबंधांच्या अभावामुळे किंवा त्यांच्या पार्टनरद्वारे समाधानी नसल्यामुळे विवाहानंतर विवाहबाह्य संबंध ठवत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत (सप्टेंबर ते नोव्हेंबर) ग्लीडेनच्या वापरकर्त्यांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सुमारे 24.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅपच्या वापरामध्ये बंगळूर शहर आघाडीवर आहे. ग्लीडेन समुदायाच्या एकूण वापरकर्त्यांपैकी बंगलोरचा वाटा 16.2 टक्के आहे. त्यापैकी मार्च 2020 मध्ये 17 टक्के नवीन वापरकर्ते सामील झाले आहेत. भारतीय जास्तीत जास्त 3.5 तास एक्स्ट्रा मॅरिटल प्लॅटफॉर्मवर गप्पा मारण्यात घालवतात. रात्री 12 वाजेपासून लोक रात्रीच्या दरम्यान या डेटिंग अॅपचा सर्वाधिक वापर करतात.