Double Masking: डबल मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती? काय कराल, काय टाळाल? जाणून घ्या
कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डबल मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तर जाणून घेऊया डबल मास्क नेमका कसा घालायचा? त्यावेळेस कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्यात....
कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क (Mask) घालणे आणि सोशल डिस्टसिंगचे (Social Distancing) पालन करणे अत्यावश्यक आहे. दिल्ली स्थित ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, "पूर्णपणे लसीकरण केले तरी मास्क लावणे बंद करु नका. हा विषाणू सतत बदलत असतो आणि विषाणूच्या निरंतर बदलत्या स्वरूपात आपली लस किती प्रभावी ठरते याबद्दल अनिश्चितता आहे." (Double Masking: मास्क 'डबल', धोका 'हाफ'! म्हणत BMCचा मुंबईकरांना डबल मास्क घालण्याचा सल्ला; पहा ट्वीट)
कोरोना व्हायरसच्या नव्या वेरिएंटमुळे घरात देखील मास्क घालण्यास सुरुवात करा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी घरात कोरोना रुग्ण असल्यास सुरक्षित राहण्यासाठी इतरांनी देखील मास्क घालणे आवश्यक आहे. तसंच घरात मास्क घालण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डबल मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तर जाणून घेऊया डबल मास्क नेमका कसा घालायचा? त्यावेळेस कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्यात....
पहा ट्विट:
राम मनोहर लोहिया (आर.एम.एल) हॉस्पिटलचे डॉ. ए.एम. के. वार्ष्णेय यांनी डबल मास्क घालण्याच्या पद्धतीबद्दल सांगितले. ते म्हणाले, डबल मास्क शक्यतो लोक सैलसर घालतात. परंतु, डबल मास्क घातल्यानंतर आपल्या तोंडातली हवा किंवा वाफ बाहेर पडता कामा नये. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. एन95 किंवा सर्जिकल मास्क पासून 50 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळतं. त्यामुळे सर्जिकल मास्क घालून त्यावरुन कॉटन मास्क घाला. कारण कॉटन मास्क अगदी सहज धुता येतो. परंतु, एन95 मास्क घातल्यास डबल मास्कची गरज पडणार नाही.
कसा घालाल डबल मास्क?
यासंबंधितच्या सूचना अलिकेडच जाहीर करण्यात आल्या आहेत.
काय कराल?
1. डबल मास्कमध्ये सर्जिकल मास्क आणि डबल किंवा ट्रिपल लेअर कपड्याचा मास्क असावा.
2.. मास्कमुळे आपल्याला श्वास घेण्यात कोणताही त्रास होत नाही, हे सुनिश्चित केले पाहिजे.
3.. कपड्याचा मास्क नियमितपणे धुवा.
काय टाळाल?
4.. डबल मास्कसाठी एकाच प्रकारचे दोन मास्क जोडू नका.
5.. सलग दोन दिवस एकच मास्क घालू नका.
6. मास्क आपल्या नाकावर कसून दाबू नका.
कोविड-19 ची लस घेतलेल्यांवरील काही निर्बंध इतर देशांमध्ये शिथील करण्यात आले आहेत. मात्र अद्याप आपल्याकडे अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा प्रकराच्या घोषणा करणे म्हणजे अतिघाई होईल, असे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत देशात अधिकाधिक लोाकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करणे योग्य ठरेल.