Eid-e-Milad-Un-Nabi 2024: ईद-ए-मिलादची सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; नवी तारीख जाहीर!
17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने 18 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Eid-e-Milad-Un-Nabi 2024: सोमवारी 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची (Eid-e-Milad-Un-Nabi 2024) सुट्टी मुंबई शहरात रद्द करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. यादिवशी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत.
त्यामुळे सोमवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता मंगळवारी अनंत चतुर्दशी आणि बुधवारी ईद-ए-मिलादची सुट्टी मिळणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईद-ए-मिलादनिमित्त 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत.
इस्लाम धर्मात रबी-उल-अव्वल महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. एकीकडे जगभरातील मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना उपवास करून अल्लाहची उपासना करतात, तर दुसरीकडे रबी-उल-अव्वल महिन्यात प्रेषित मोहम्मद यांची जयंती ईद मिलाद उन नबी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की प्रेषित मोहम्मद यांचा जन्म इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील तिसरा महिना रबी-उल-अवलच्या 12 तारखेला झाला होता, म्हणून त्यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते. या वर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी 16 सप्टेंबर रोजी साजरी केली जात आहे. दरवर्षी या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. यंदा मात्र, 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने, 18 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ईद-ए-मिलादची सोमवारची शासकीय सुट्टी रद्द
अशा परिस्थितीत, या प्रसंगी, भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळा पूर्णपणे बंद राहतील म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी भारतात सार्वजनिक सुट्टी असेल.