International Women's Day 2019: 8 मार्चला का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? कशी झाली सुरुवात?
जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत हा दिवस साजरा केला जातो.
दर वर्षी 8 मार्चला 'इंटरनॅशनल वुमन्स डे' (International Women's Day) म्हणजेच 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. जगभरातील विविध देशात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे सेलिब्रेशन होते. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राजकीय, सामाजिक आणि इतर विविध क्षेत्रात प्रगती पथावर पोहचलेल्या महिलांचा सन्मान महिला दिनानिमित्त करण्यात येतो. आताच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी पूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. महिलांना शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार नव्हता. स्वातंत्र्य नव्हते. मुलभूत हक्कांपासून वंचित असलेल्या महिला वर्गाला आपले हक्क मिळवण्यासाठी लढावे लागले.
1909 मध्ये साजरा झाला पहिला महिला दिन
सर्वप्रथम 1909 मध्ये 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. तेव्हापासून याला अधिकृत मान्यता मिळाली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.'
1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्युयॉर्क शहरात मतदानाच्या अधिकारासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी आणि चांगल्या रोजगारासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर अमेरिकेच्या समाजवादी पार्टीने केलेल्या घोषणेनुसार, 1909 मध्ये युनाईटेड स्टेट्स मध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा केला गेला.
पूर्वी 'या' दिवशी साजरा होत असे महिला दिन
त्यानंतर 1910 साली जर्मनीच्या क्लारा जेटकिन (Clara Zetkin) नावाच्या महिलेने जागतिक महिला दिन साजरा करण्याचा विचार जगापुढे मांडला. या प्रस्तावाला 17 देशातील 100 हून अधिक महिलांनी सहमती दर्शवली आणि जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली. त्यावेळेस जागतिक महिला दिनाची सुरुवात करणे, यामागे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा प्रमुख उद्देश होता.
त्यानंतर 1911 साली 19 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. याला प्रथमच जगभरातील लाखो महिला आणि पुरुषांनी पाठिंबा दर्शवला. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांना मर्यादीत हक्क होते. राजकीय आणि काम करण्याच्या अधिकारावर अनेक बंधने होती. त्यामुळे पहिल्या महायुद्धादरम्यान, महिला दिन युद्धाविरुद्धचे प्रतीक बनला. म्हणून रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी महिला दिन साजरा करण्याचे ठरवले.
अखेर 8 मार्च ठरला 'जागतिक महिला दिन'
1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युके मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. इतिहासात 1975 हे साल 'रेड लेटर ईअर' (Red Letter Year) म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनाईटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर 1976 ते 1985 हे महिलांचे दशक म्हणून ओळखले जावू लागले. 2011 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मन्थ' (Women's History Month) असल्याचे घोषित केले.