IPL Auction 2025 Live

Akshaya Tritiya 2020: यंदा 26 एप्रिल रोजी साजरी करा अक्षय्य तृतीया; जाणून घ्या या सणाचे महत्त्व

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात ज्या तृतीयेला चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो त्या तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' म्हणतात.

Akshaya Tritiya 2020 (Photo Credits: Sacred Hinduism/ Facebook)

Akshaya Tritiya 2020 Date: वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya). वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात ज्या तृतीयेला चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो त्या तृतीयेला 'अक्षय्य तृतीया' म्हणतात. कारण या दिवशी केलेल्या जप, होम, दान इत्यादी गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात. म्हणूनच या दिवशी पुण्यकर्म करावे, चांगले विचार मनी बाळगावे, चांगले बोलावे असे म्हटले जाते. यंदा अक्षय्य तृतीया रविवार, दिनांक 26 एप्रिल रोजी आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक असल्याने या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. तसंच कोणतंही शुभकार्य करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. मात्र यंदा गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती या सणांप्रमाणे अक्षय्य तृतीयेवरही कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे कोणतंही शुभकार्य योजता येणार नाही किंवा खरेदीचा आनंद काही घेता येणार नाही. परंतु, घरच्या घरी पूजा करुन गोडाचा नैवेद्य दाखवून हा सण आपण नक्कीच साजरा करु शकतो.

अक्षय्य तृतीये दिवशी काहीतरी दान करण्याची प्रथा आहे. समाजातील गरजू गरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हा या मागील उद्देश आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जलदान, ज्ञानदान, पुस्तकदान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, वस्त्रदान करावे. मात्र कोणतेही दान श्रेष्ठच असते. म्हणून आपल्याला जमेल तसे दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न या दिनानिमित्त आपण नक्कीच करुया.

अक्षय्य तृतीयेमागची कथा अशी आहे की, शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करीत असे आणि नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगितले. ते ऐकून घेऊन व्यापारी नदीकाठी गेला. तेथे स्नान केले आणि पितरांचे स्मरण केले. त्यानंतर घरी येऊन त्याने पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्याचे दान केले. अशा रितीने जलदानाचा उपक्रम त्याने चालूच ठेवला. वृद्धापकाळी भगवंताचे नामस्मरण करीत असतानाच त्याला मृत्यू आला. पुढच्या जन्मी त्याला राजपद मिळाले तरी त्याने दानधर्म चालूच ठेवला. त्यामुळे त्याला बरीच संपत्ती प्राप्त झाली. त्याचा खजिना कधीही रिकामा झाला नाही. म्हणून या दिवशी दानाचे महत्त्व सांगितले आहे.