Jammu Kashmir Update: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, हल्लेखोरांचा शोध सुरू

अधिका-यांनी सांगितले की, परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तौसिफ अहमद असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

Terrorists | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) श्रीनगरमध्ये (Srinagar) रविवारी संध्याकाळी एका 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी (Terrorists) गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही घटना श्रीनगरमधील बटमालू (Batmaloo) भागात घडली. अधिका-यांनी सांगितले की, परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तौसिफ अहमद असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.  ते म्हणाले, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, एसडी कॉलनी, बटामालू येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल तौसिफ अहमद (Constable Tousif Ahmed) यांच्यावर गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी येथील एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने (NC) या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले की, श्रीनगरच्या बाटमालू येथे 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करतो ज्यात त्याचा जीव गेला. निंदा करायला शब्द पुरणार ​​नाहीत.  अल्लाह त्यांना स्वर्गात स्थान देवो. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आमच्या संवेदना आहेत.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 11 नागरिकांची हत्या केली होती. ज्यामध्ये शाळेतील शिक्षक, इतर राज्यातील मजूर आणि औषध दुकानदार यांचाही सहभाग होता. रविवारी शोपियान जिल्ह्यातील रुग्णालयातून 'द रेझिस्टन्स फ्रंट'च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की टीआरएफचा सक्रिय दहशतवादी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

सोहेल अहमद लोन असे या दहशतवाद्याचे नाव असून तो शोपियानच्या हरमेन भागातील रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि गंभीर अवस्थेत श्रीनगरच्या SMHS रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने सांगितले की, दहशतवाद्याच्या मानेवर गोळीचा घाव आहे. त्याच्या दुखापतीमागील कारणाचा पोलीस तपास करत आहेत.