RG Kar Case: कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावरून गदारोळ, ज्युनियर डॉक्टरचे आंदोलन आणखी तीव्र

आज ते शहरातील विविध दुर्गापूजा मंडपात पत्रिकांचे वाटप करणार असून रक्तदान शिबिराचेही आयोजन करणार आहेत. कनिष्ठ डॉक्टर देबाशीष हलदर म्हणाले की, जेव्हा आरजी कार हॉस्पिटलच्या ५० हून अधिक वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या समर्थनार्थ सामूहिक राजीनामा दिला तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला.

RG Kar Case

RG Kar Case: कोलकात्यातील मृत डॉक्टर रेप आणि हत्या प्रकरणी तिला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टर आंदोलन तीव्र करत आहेत. आज ते शहरातील विविध दुर्गापूजा मंडपात पत्रिकांचे वाटप करणार असून रक्तदान शिबिराचेही आयोजन करणार आहेत. कनिष्ठ डॉक्टर देबाशीष हलदर म्हणाले की, जेव्हा आरजी कार हॉस्पिटलच्या ५० हून अधिक वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या समर्थनार्थ सामूहिक राजीनामा दिला तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढला. मात्र, राज्य सरकारने असा कोणताही राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे. मृत महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणे हे आपले प्राथमिक ध्येय असल्याचे कनिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे देखील वाचा: Hindenburg Research अदानीनंतर Roblox च्या पाठी; की मेट्रिक्स फुगवल्याचा आरोप; समभाग घसरले

 आरोग्य सचिव एनएस निगम यांना हटवणे, प्रशासकीय अपयशाची जबाबदारी निश्चित करणे आणि विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालणे या मुद्द्यांवरही आंदोलक भर देत आहेत.

रुग्णालयातील पोलीस बंदोबस्त वाढवावी, कायमस्वरूपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांनी ९ ऑगस्टपासून सुरू केलेले आंदोलन राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर 42 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी संपले.

 मात्र, 1 ऑक्टोबर रोजी सागर दत्ता हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टरांवर रुग्णाच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्यानंतर त्यांनी पुन्हा 'काम बंद' आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास कनिष्ठ डॉक्टरांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

राज्य सरकारने यावर लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करू, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासोबतच उपोषणकर्त्या डॉक्टरांची प्रकृती बिघडल्यास त्याला राज्य प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.