शरद पवार यांच्यासाठी खूशखबर! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झारखंडमध्ये गजर; कमलेश कुमार सिंह यांच्या रुपात घड्याळ योग्य वेळ साधण्याची शक्यता
काँग्रेस-जेएमएम-आरजेडी आघाडीसाठी झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिंकणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सत्तासहभागानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झारखंडमध्येही आघाडीत सहभागी होऊ शकतो.
Jharkhand Assembly Election Results 2019: झारखंड विधानसभा निवडणूक 2019 (Jharkhand Assembly Election 2019) ची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनुसार बहुतांश जागांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार काही जांगवर काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस-जेएमएम-आरजेडी महाआघाडीस बहुमत मिळताना दिसत असून, सत्ताधारी भाजप (BJP) पराभवाच्या छायेत आहे. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, भाजप केवळ 29 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अचूक वेळ साधत सत्तांतर करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्षाचे घड्याळ झारखंडमध्येही एका जागेवर अचूक वेळ दाखवू पाहत आहे. झारखंड विधानसभेसाठी हुसैनाबाद (Hussainabad Constituency) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलेश कुमार सिंह हुसैनाबाद (Hussainabad) हे रिंगणात आहेत. प्राप्त माहितीनुसार, सध्या तरी या मतदारसंघातून कमलेश कुमार (Kamlesh Kumar Singh) आघाडीवर असून, ते विजयासमीप पोहोचल्याचे वृत्त आहे.
झारखंड विधानसभा सदस्य संख्या विचारात घेता ती एकूण 87 इतकी आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमताचा आकडाही इतर राज्यांच्या तुलनेत इथे अगदीच कमी आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येने इथे सत्तापालट होत असतो. त्यामुळे छोट्या पक्षांना अपक्षांना इथे प्रचंड महत्त्व राहते. त्यामुळे कमलेश कुमार सिंह यांनी हुसैनाबाद ही जागा जिंकली तर सत्तास्थापनेसाठी दावा करणाऱ्या आणि विरोधात बसणाऱ्या दोन्ही पक्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, कमलेश कुमार सिंह हे भाजप आणिी जेएमएम सरकारमध्ये मंत्रिही राहिले आहेत.
दरम्यान, कमलेश सिंह हे नोव्हेंबर 2018 मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले होते. काँग्रेस-जेएमएम-आरजेडी आघाडीसाठी झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिंकणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील सत्तासहभागानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झारखंडमध्येही आघाडीत सहभागी होऊ शकतो. (हेही वाचा, झारखंड मध्ये JMM चा जोर कायम; भाजपला मागे टाकत 40 जागांवर आघाडी)
हुसैनाबाद मतदारसंघ हाती आलेला कल
उमेदवाराचे नाव | पक्ष | आघाडी |
कमलेश कुमार सिंह | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | 12490 |
शेर अली | बसप | 11108 |
संजय यादव | आरजेडी | 9202 |
विनोद कुमार सिंह | अपक्ष | 9240 |
कुशवाहा शिवपूजन मेहता | आजसू | 4308 |
झारखंडमध्ये एकूण 85 पैकी 81 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, 29 विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे. तर विरोधी पक्षात असलेले झामुमो 24, काँग्रेस 12 आणि राजद 5 जागांवर पुढे आहे. जेवीएम(पी) , आजसू प्रत्येकी 3, सीपीआय-एमएल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुक्रमे एका जागेवर आघाडीवर आहेत.