Yes Bank Crisis: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पूरती वाट लावली- राहुल गांधी
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पार वाट लावली आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
आर्थिक संकटामुळे येस बँकेची (Yes Bank) झालेली अवस्था पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पार वाट लावली आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. खाजगी क्षेत्रातील येस बँकेची सातत्याने ढासळत जाणारी आर्थिक परिस्थिती लक्षात घेत काल (गुरुवार, 5 मार्च) भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर काही निर्बंध लागू केले. त्यानुसार आता महिन्याभरात खातेधारकांना बँकेतून केवळ 50,000 रुपये काढता येणार आहेत. यावरुनच राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले की, "नो येस बँक. मोदी आणि त्यांच्या विचारांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची पूरती वाट लावली आहे."
राहुल गांधी यांचे ट्विट:
रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर लागू केलेल्या निर्बंधांनंतर खातेधारक चिंतेत आहेत. त्यांनी आज सकाळपासूनच बँक आणि एटीएम बाहेर गर्दी करायला सुरुवात केली. मात्र एटीएम बाहेर कॅश नसल्याचे बोर्ड झळकत होते. तर मोबाईल आणि इंटरनेट बँकींग या सेवाही कार्यरत नव्हत्या. (Yes Bank खातेदारांची बँक, एटीएम कडे धाव; मात्र ATM मध्ये खळखळाट)
येस बँकेवर 5 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत आरबीआयची स्थगिती असणार आहे. या काळात खातेदारांना खात्यातून केवळ 50 हजार रुपये काढण्याची मूभा आहे. या सर्व परिस्थितीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. 50 हजार रुपयांची मर्यादा ही केवळ 30 दिवसांकरीता असल्याने ग्राहकांनी घाबरु जावू नये. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.