मुलगा इटलीहून परतला असल्याची माहिती लपवणाऱ्या South Western Railway च्या महिला अधिकारी निलंबित
मात्र काही ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते थैमान पाहता योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांचा निष्काळजीपणा पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना समोर येत आहे. आपला मुलगा इटलीहून परत आल्याची माहिती साऊथ पश्चिम रेल्वेच्या (South Western Railway) एका महिला अधिकाऱ्याने लपवून ठेवल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. त्यानंतर संबंधित रेल्वे महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तसंच ही माहिती मिळताच अधिकाऱ्याच्या मुलाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
संपूर्ण जगाला हादरुन सोडणाऱ्या कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अशा प्रकारच्या घटना समोर येत असून त्यामुळे परिस्थितीत अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
ANI Tweet:
निलंबनानंतर या महिला अधिकारी यांनी सांगितले की, "मुलगा इटलीहून नाही तर स्पेनहून परत आला होता. कामानिमित्त तो जर्मनीत असतो. तसंच स्पेनहून फ्लाईटने तो भारतात आला." तसंच निलंबनानंतर त्यांना कर्नाटक मधील बंगळुरु येथे पोस्टींग देण्यात आली आहे.
एकीकडे सरकारने दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करणारा वर्ग पाहायला मिळत असताना एकीकडे अशा प्रकराचे निष्काळजीपणाचे वर्तन समोर येत आहे. कोरोनाचे भारतात एकूण 195 रुग्ण असून दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या संख्येने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे.