दिल्ली जामा मशिदीच्या शाही इमामांचं मुस्लिम बांधवांना रमजान दरम्यान घरीच नमाज अदा करण्याचं आवाहन, 'सरकारी नियमावलीचं पालन केल्यास लवकरच COVID 19 वर मात करू'
आपण भारत सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं तर देशातून कोव्हिड 19 हा आजार लवकर संपवू शकतो. असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतासह जगभरात कोव्हिड 19 हा आजार धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे साधारण जगभरात येत्या एक-दोन दिवसात सुरू होणार्या रमजानवर त्याचं सावट आहे. केरळ मध्ये शुक्रवार, 24 एप्रिल पासून रमजान सुरू होत असल्याने आता या काळात मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करावी, सोशल डिस्टंसिंग पाळावं असं आवाहन आज (23 एप्रिल) दिल्ली जामा मशिदीच्या इमामांकडून करण्यात आलं आहे. आपण भारत सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं तर देशातून कोव्हिड 19 हा आजार लवकर संपवू शकतो. असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसात रमजानची धामधूम असली तरीही घरीच रहा. वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. यामुळेच सार्यांचं रक्षण होण्यास मदत होणार असल्याचा सल्ला त्यांनि देशातील मुस्लिम बांधवांना दिला आहे. Ramadan 2020: मुस्लिम बांधवांच्या पवित्र 'रमजान' महिन्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या निषिद्ध घ्या जाणून.
दिल्लीमध्ये मागील महिन्यात तबलिगी जमातीचा मकरजचा कार्यक्रम निजामुद्दीनमध्ये पार पडला. या कार्यक्रमात देशा-परदेशातून मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. देशावर कोरोनाचं संकट दबक्या पावलांनी शिरकाव करत असताना सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचं आवाहन केलेले असूनही हा कार्यक्रम झाला. त्यानंतर तबलिगींचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती शोधून कोव्हिडचा प्रसार देशभरात कुठपर्यंत पोहचला आहे याचा माग घेण्याचं मोठं आवाहन सरकारी यंत्रणांसमोर होतं. यावरून देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यामुळे आता रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी त्यांचा हा पवित्र महिना घरच्या घरी साजरा करण्याचं आवाहन केले जात आहे.
ANI Tweet
भारतामध्ये वाढणारी कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या नागरिकांच्या मनात भीती वाढवत आहे. आज भारतात एकूण 21393 कोरोना बाधित रुग्ण आहेत. सुमारे 4257 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र घरीच 14 दिवस क्वारंटीन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर 16454 कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरु आहेत.देशात आतापर्यंत 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.