SBI Share Price Surges: SBI चा ऐतिहासिक धमाका! 21028 कोटींचा विक्रमी नफा; शेअर्समध्ये 6 टक्क्यांची मोठी उसळी
उत्कृष्ट निकालांमुळे जागतिक आणि देशांतर्गत ब्रोकरेज फर्म्सनी एसबीआयच्या शेअरसाठी 'बाय' रेटिंग दिले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI) वित्त वर्ष २०२५-२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. बँकेचा निव्वळ नफा वार्षिक तत्त्वावर २४.५ टक्क्यांनी वाढून ₹२१,०२८ कोटी झाला आहे. बँकेच्या इतिहासातील ही एका तिमाहीतील सर्वोच्च नफा नोंदवणारी कामगिरी ठरली आहे. या निकालांच्या जोरावर सोमवारी शेअर बाजार उघडताच एसबीआयच्या शेअरने ६ टक्क्यांची झेप घेत ₹१,१२८ चा नवा विक्रम प्रस्थापित केला.
विक्रमी नफा आणि उत्पन्नातील वाढ
बँकेचे अध्यक्ष सी.एस. शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ९ टक्क्यांनी वाढून ₹४५,१९० कोटी झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेचा परिचालन नफा (Operating Profit) ३९.५ टक्क्यांनी वाढून ₹३२,८६२ कोटींवर पोहोचला आहे. एसबीआय म्युच्युअल फंडातून मिळालेल्या ₹२,२०० कोटींच्या लाभांशामुळे बँकेच्या नफ्यात मोठी भर पडली आहे. तसेच, बँकेचा एकूण व्यवसाय आता १०३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
एनपीए (NPA) मध्ये घट आणि सुधारलेली स्थिती
बँकेसाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे थकीत कर्जांच्या (NPA) प्रमाणात झालेली लक्षणीय घट.
ग्रॉस एनपीए (Gross NPA): गेल्या वर्षीच्या २.०७ टक्क्यांच्या तुलनेत आता हा दर १.५७ टक्क्यांवर आला आहे.
निव्वळ एनपीए (Net NPA): हा दर अवघ्या ०.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या दोन दशकांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. कर्ज वसुलीतील सुधारणा आणि मालमत्तेच्या दर्जात झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कर्ज आणि ठेवींमधील वाढ
एसबीआयच्या कर्ज वाटपात (Loan Growth) १५.१४ टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. प्रामुख्याने लघु आणि मध्यम उद्योग (SME) आणि कृषी क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यात मोठी प्रगती दिसून आली. बँकेच्या ठेवी देखील ९ टक्क्यांनी वाढून ₹५७ लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. येणाऱ्या काळात बँक आपल्या कर्ज वाढीचा वेग १३ ते १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
शेअर बाजाराची प्रतिक्रिया
सोमवारी एकाच दिवसात एसबीआयच्या बाजार भांडवलात (Market Cap) मोठी वाढ झाली असून, हा शेअर निफ्टी आणि सेन्सेक्समधील सर्वाधिक नफा मिळवून देणारा शेअर ठरला.