Shocking! ऑनलाईन गेमसाठी मुलाने उडवले आईच्या खात्यातील 36 लाख रुपये; वडिलांच्या मृत्युनंतर मिळाली होती आर्थिक मदत

अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे दिवंगत वडील पोलिसात नोकरी करत होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही खात्यांमधील लाखो रुपये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भरपाई म्हणून मिळाले होते.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

तुमच्या घरातील लहान मुलांनाही मोबाईल गेम (Online Game) खेळण्याचे व्यसन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या नादात 16 वर्षांच्या मुलाने आईच्या खात्यातील 36 लाख रुपये उडवले आहेत. हैदराबादच्या अंबरपेट भागातील रहिवासी असलेल्या या मुलाने ऑनलाइन गेमवर पैसे खर्च करण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्यांचा वापर केला. सायबर क्राईम विंगने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आजोबांच्या स्मार्टफोनवर फ्री फायर गेम डाउनलोड केला होता व हळूहळू त्याला या खेळाचे व्यसन जडले.

सुरुवातीला त्याने या खेळासाठी 1500 रुपये खर्च केले आणि नंतर आईच्या बँक खात्यातून 10 हजार रुपये खर्च करण्यास सुरुवात केली. मुलगा इथेच थांबला नाही, त्याने नंतर या गेमवर लाखो रुपये उडवायला सुरुवात केली. याची माहिती कुटुंबातील कोणालाच नव्हती. खेळाच्या क्रेझमुळे मुलगा एका दमात दीड ते दोन लाख रुपये खर्च करायचा. जेव्हा मुलाच्या आईने बँकेत जाऊन तिचे खाते तपासले तेव्हा ही बाब उघडकीस आली. महिलेने पाहिले की तिच्या खात्यात 27 लाख रुपये होते जे आता गायब आहेत.

त्यानंतर दुसऱ्या खात्याची तपासणी केली असता, त्यातूनही नऊ लाख रुपये गायब असल्याचे दिसून आले. याबाबत महिलेने पोलिसांत तक्रार केली. तपासात सर्व पैसे गेममध्ये खर्च झाल्याचे निष्पन्न झाले. अकरावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचे दिवंगत वडील पोलिसात नोकरी करत होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही खात्यांमधील लाखो रुपये तिच्या पतीच्या मृत्यूनंतर भरपाई म्हणून मिळाले होते. (हेही वाचा: Crime: नवीन स्मार्टफोन न दिल्याने एका व्यक्तीकडून आईची हत्या)

दरम्यान याआधी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पंखाजूर या ठिकाणीही असेच आश्चर्यकारक प्रकरण समोर आले होते. इथे सलग तीन महिन्यांत एका महिलेच्या खात्यातून तीन लाख 22 हजार रुपये काढून घेण्यात आले होते. महिलेने याबाबत तक्रार केल्यानंतर तपासात निष्पन्न झाले की, पीडित महिलेच्या 12 वर्षाच्या मुलाद्वारे एका ऑनलाईन गेमसाठी हे पैसे खर्च केले होते.