Rahul Gandhi: हाथरस दुर्घटना पीडितांच्या कुटुंबाच्या आर्थित मदतीत वाढ करा, राहुल गांधी यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र
उत्तर प्रदेश सरकारने हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, ती तोकडी आहे, त्यामुळे या आर्थिक मदतीत वाढ करावी, अशी मागणी मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना करतो आहे, असं राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या हाथरस येथे एका संत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. या घटनेनंतर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी एक्स या समाजमाध्यमावर हे पत्र शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. शनिवारी हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहित असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी या घटनेतील पीडित कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - Rahul Gandhi यांनी घेतली Hathras stampede मधील मृतांच्या कुटुंबियांची भेट!)
उत्तर प्रदेश सरकारने हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांना जी आर्थिक मदत जाहीर केली आहे, ती तोकडी आहे, त्यामुळे या आर्थिक मदतीत वाढ करावी, अशी मागणी मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना करतो आहे, असं राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच ज्या जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यांनाही योग्य आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
पाहा पोस्ट -
दरम्यान, राहुल गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशात पोहोचत हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सत्संगाच्या दिवशी नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी कशी झाली? त्याबाबत माहिती घेतली होती. तसेच या कुटंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचं आश्वासन दिलं होतं.