दहीहंडीत विनापरवाना डान्स शो भोवला! पुण्यातील बिबवेवाडीत राधा पाटीलवर गुन्हा; काय आहे प्रकरण?

दहीहंडीसारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. त्यामुळे सार्वजनिक शांतता, महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची काटेकोर तपासणी करूनच निर्णय घेतले जात असल्याचे पोलिस उपायुक्त (झोन ७) अभिनश कुमार यांनी सांगितले.

दहीहंडीत विनापरवाना डान्स शो भोवला! पुण्यातील बिबवेवाडीत राधा पाटीलवर गुन्हा; काय आहे प्रकरण?

पुण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान विनापरवाना आणि आवश्यक प्रमाणपत्रांशिवाय आयोजित केल्या जाणाऱ्या डान्स तसेच लावणी कार्यक्रमांवर पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही डान्स कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील-मुंबईकर आणि दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, केसनंद येथे नृत्यांगना ऐश्वर्या जाधव (लातूरकर) यांच्या लावणीच्या कार्यक्रमाला कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

​काय आहे बिबवेवाडीतील प्रकरण?

​बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील सुखसागर नगर, आंबामाता रोड येथील भैरवनाथ सोसायटीमध्ये दहीहंडीनिमित्त 'एम्पायर ग्रुप ए के बॉईज'च्या वतीने राधा पाटील-मुंबईकर यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मंडळाचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती.

​मात्र, आयोजक आणि कलाकारांनी महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे (Stage Performances Scrutiny Board) आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी या कार्यक्रमास अधिकृत परवानगी नाकारली होती. पोलिसांचा नकार असतानाही रविवारी हा कार्यक्रम पार पडल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी राधा पाटील-मुंबईकर, भूषण सोनवणे आणि अमोल काटे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

​कार्यक्रमात कोणताही अश्लील किंवा आक्षेपार्ह प्रकार घडू नये यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र अनिवार्य असते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी स्पष्ट केले.

​"परवानगी नव्हती तर सुरू का करू दिला?" – राधा पाटील यांचा सवाल

​या कारवाईवर प्रतिक्रिया देताना नृत्यांगना राधा पाटील-मुंबईकर म्हणाल्या, "आयोजकांनी परिनिरीक्षण मंडळाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता आणि त्याची पावती आमच्याकडे होती. त्या पावतीच्या आधारे कार्यक्रम सुरू करू शकतो असे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु, माझ्यासह तीन मुलींचे सादरीकरण झाल्यानंतर पोलिसांनी येऊन कार्यक्रम थांबवला. जर पोलिसांना परवानगी नाकारायची होती, तर त्यांनी आम्हाला आधीच स्पष्ट सांगायला हवे होते. परवानगी नाकारल्याचे आधी कळले असते, तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलोच नसतो. आता आम्ही ही कायदेशीर लढाई लढू आणि यापुढे सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात सादरीकरण करणार नाही."

​केसनंदमध्ये ऐश्वर्या लातूरकरच्या लावणीला नकार

​याच दरम्यान, हवेली तालुक्यातील केसनंद येथे 'छाया ग्रुप'च्या दहीहंडी उत्सवात नृत्यांगना ऐश्वर्या जाधव (ऐश्वर्या लातूरकर) यांच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या कार्यक्रमामुळे उपस्थित महिला प्रेक्षकांची गैरसोय होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा किंवा सामाजिक तणावाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारली.

​दहीहंडीसारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. त्यामुळे सार्वजनिक शांतता, महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची काटेकोर तपासणी करूनच निर्णय घेतले जात असल्याचे पोलिस उपायुक्त (झोन ७) अभिनश कुमार यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2026 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).