Pune Metro Line 3: सुरक्षा मंजुरी मिळूनही पुणे मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन रखडले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून उत्तराची प्रतीक्षा

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्याला 'सीएमआरएस'ची सुरक्षा मंजुरी मिळून महिना उलटला तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्घाटनाची तारीख न मिळाल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.

पुणे शहराला हिंजवडी आयटी पार्कशी जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, त्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) मंजुरीही मिळाली आहे. मात्र, ही सुरक्षा मंजुरी मिळून महिना उलटून गेला तरी अधिकृत उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी ही मेट्रो अजूनही प्रतीक्षेत आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या एकूण मार्गाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जात आहे. पहिल्या टप्प्यात मान (Hinjewadi) मेट्रो स्टेशन ते बाणेर येथील आर. के. लक्ष्मण म्युझियम स्टेशनपर्यंतचा १३ किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीतील मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै रोजी या पहिल्या टप्प्यासाठी प्रवासी वाहतूक सुरू करण्यास तात्पुरती मंजुरी (Provisional Authorisation) दिली होती.

उद्घाटनाच्या तारखेची प्रतीक्षा

सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) पहिल्या टप्प्याच्या अधिकृत उद्घाटनासाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्याप तिथून निश्चित तारीख किंवा हिरवा कंदील मिळालेला नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने उद्घाटनाची सर्व प्राथमिक तयारी आणि सुरक्षा व्यवस्था पूर्ण करून ठेवली आहे.

आयटीयन्सचा प्रवास कधी सुकर होणार?

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मेट्रो ३ सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून थेट ४० ते ४५ मिनिटांवर येण्याची अपेक्षा आहे. सर्व तांत्रिक अडथळे दूर होऊन आणि रेल्वे रुळावर धावण्यासाठी सज्ज असताना केवळ औपचारिक उद्घाटनाच्या तारखेअभावी सेवा रखडल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात बालेवाडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या १० किलोमीटर मार्गाचे काम केले जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement