Melody Road Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडवर देशातील पहिला 'मेलोडी रोड' सज्ज; आता प्रवासात ऐकू येणार 'जय हो'ची धून
हा प्रकल्प हंगेरियन कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६.२१ कोटी रुपये खर्च आला आहे.
मुंबई: मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोस्टल रोडवर देशातील पहिल्या 'मेलोडी रोड'चे (Musical Road) यशस्वीरीत्या लोकार्पण केले आहे. या विशेष तंत्रज्ञानामुळे आता कोस्टल रोडवरून प्रवास करताना वाहनचालकांना 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील प्रसिद्ध 'जय हो' या गाण्याची धून ऐकायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ फेब्रुवारी २०२६ रोजी या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
नेमका कुठे आहे हा मेलोडी रोड?
हा संगीतमय रस्ता दक्षिण मुंबईकडून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या उत्तर वाहिनीवर (Northbound carriageway) तयार करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरील बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर वरळीच्या दिशेला साधारण ५०० मीटर अंतरावर पहिल्या मार्गिकेत (lane) या 'म्युझिकल स्ट्रिप्स' बसवण्यात आल्या आहेत. ही मार्गिका दुभाजकाच्या अगदी शेजारी आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
मेलोडी रोड ही संकल्पना प्रामुख्याने जपानमध्ये विकसित झाली आहे. यामध्ये रस्त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट अंतराने आणि ठराविक खोलीचे 'ग्रूव्ह्स' (खाचा) किंवा रंबल स्ट्रिप्स तयार केल्या जातात. जेव्हा एखादे वाहन या पट्ट्यांवरून ठराविक वेगाने जाते, तेव्हा टायर आणि रस्ते यांच्यातील घर्षणामुळे विशिष्ट कंपनं निर्माण होतात. या कंपनांतून संगीताचे सूर उमटतात.
कसा घ्यावा संगीताचा आनंद?
वाहनचालकांना 'जय हो'ची ही धून स्पष्टपणे ऐकण्यासाठी गाडीचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर दरम्यान ठेवावा लागणार आहे. जर वेग यापेक्षा कमी किंवा जास्त असेल, तर धून व्यवस्थित ऐकू येणार नाही. विशेष म्हणजे, ही धून गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे ऐकू येते, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आनंददायी होतो.
हा प्रकल्प हंगेरियन कंपनीच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ६.२१ कोटी रुपये खर्च आला आहे. वाहनचालकांना या मेलोडी रोडबद्दल माहिती देण्यासाठी बोगद्यामध्ये ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर आधीच सूचना फलक लावण्यात आले आहेत. जेणेकरून चालक आपला वेग योग्य प्रकारे नियंत्रित करू शकतील.
जागतिक स्तरावर जपान, दक्षिण कोरिया, हंगेरी आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये असे मेलोडी रोड पाहायला मिळतात. भारतात हा प्रयोग पहिल्यांदाच मुंबईत करण्यात आला असून, यामुळे पर्यटनाला आणि प्रवासाच्या आनंदाला नवी दिशा मिळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)