Mumbai School Closed On 7th July: मंगळवारपर्यंत महापालिकेच्या शाळा बंद
पत्रकारांशी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, "हवामानाची गंभीर परिस्थिती पाहता प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर अर्ध्या तासाला हवामानाचे अपडेट्स आणि सतर्कतेचे संदेश (Alert Messages) पाठवले जात आहेत. ८ ते १० जुलै दरम्यान पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे."
Will Mumbai Schools Remain Closed Tomorrow, July 7: मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावासामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज, वेगवान वारे आणि समुद्रातील भरती (High Tide) लक्षात घेता मुंबईत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व शाळा मंगळवारपर्यंत (७ जुलै) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, परिस्थिती पाहता सुट्टी आणखी एक ते दोन दिवस वाढवली जाऊ शकते, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली आहे.
महापौरांचे नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाची तयारी
पत्रकारांशी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, "हवामानाची गंभीर परिस्थिती पाहता प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर अर्ध्या तासाला हवामानाचे अपडेट्स आणि सतर्कतेचे संदेश (Alert Messages) पाठवले जात आहेत. ८ ते १० जुलै दरम्यान पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे."
तसेच, शहरातील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (घरून काम करण्याची) परवानगी देण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे. दरम्यान, सध्या लोकल ट्रेन सेवा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
६० ते ७० किमी वेगाने वारे वाहणार, रेड अलर्ट जारी
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात गेल्या २४ तासांत सरासरी १०५.२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरात १६१.११ मिमी आणि पश्चिम उपनगरात १५९.४० मिमी इतका मुसळधार पाऊस पडला आहे.
पावसासोबतच ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा हा वेग आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊनच मुंबईतील सतर्कतेचा स्तर वाढवून 'रेड अलर्ट' करण्यात आला आहे. समुद्रात येणाऱ्या मोठ्या भरतीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.
प्रशासनाने सर्व नागरिकांना स्थानिक बातम्या आणि अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सवरून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.