मुंबईकरांचा प्रवास होणार 'सुपरकूल'! 238 नव्या एसी लोकलच्या निर्मितीला लवकरच वेग
भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिट्सकडे वातानुकूलित ईएमयू, वंदे भारत ट्रेनसेट्स आणि वंदे मेट्रो ट्रेनसेट्स यांसह आधुनिक प्रवासी रेल्वे डब्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे.
रेल्वे डबे बनवणारे देशातील तीन कारखाने, इंटीग्रल कोच फॅक्टरी, आयसीएफ, चेन्नई, रेल कोच फॅक्टरी आरसीएफ कपूरथला आणि मॉडर्न कोच फॅक्टरी -एम सीएफ रायबरेली इथल्या उत्पादन केंद्रात, 238 एसी ईएमयु डबे बनवण्याच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. एमयुटीपी म्हणजेच, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत, पायाभूत सुविधांची उपलब्धता वेळेत असेल, हे सुनिश्चित व्हावे, या दृष्टीने हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.
या उत्पादन कार्यक्रमानुसार, इंटिग्रल कोच फॅक्टरी मार्फत 120 वातानुकूलित एसी ईएमयू डबे, रेल कोच फॅक्टरी मध्ये 71 डबे आणि मॉडर्न कोच फॅक्टरी मध्ये 47 रेक तयार करण्यात येणार आहेत. म्हणजेच, एकूण 238 एसी डबे तयार होतील.
रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एसी ईएमयू रेकची खरेदी विद्यमान आणि RDSO/ICF तांत्रिक निर्देशांनुसार करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे या रेल्वे डब्यांचे जलद उत्पादन आणि सुलभ पुरवठा होणार आहे.
हा पुरवठा, 2027 पासून सुरू होण्याचे नियोजन असून, मंजूर करण्यात आलेले सगळे डबे, 2030 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 2027 मध्ये पहिले ट्रेनसेट्स उपलब्ध होतील आणि त्यानंतर 2030 पर्यंत, संपूर्ण डबे मिळणे, पायाभूत सुविधा कार्यान्वित होणे आणि रोलिंग स्टॉक उपलब्ध होणे यामधील तफावत भरून काढण्यास मदत करेल. तसेच, उपलब्ध पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करण्यासही यामुळे मदत होईल