Mizoram: जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख Ziona Chana यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन; 38 बायका आणि 89 मुले झाली पोरकी
या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. आता या कुटुंबाचे प्रमुख झिओना चाना (Ziona Chana) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.
मिझोरम (Mizoram) येथील चाना कुटुंब (Chana Family) हे जगातील सर्वात मोठे कुटुंब म्हणून ओळखले जाते. या कुटुंबात एकूण 181 लोक आहेत. आता या कुटुंबाचे प्रमुख झिओना चाना (Ziona Chana) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार मिझोरमचे सीएम झोरमथंगा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. चाना यांच्या कुटुंबात 38 बायका आणि 89 मुले आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबांमुळे मिझोरम आणि चानां कुटुंबाचे गाव बकटावंग तेलंग्नम (Baktawng Tlangnuam) पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होते. हे कुटुंब एकत्र आपल्या 100 खोल्यांच्या घरात राहत आहे.
झिओना यांचे हे गाव मिझोरमची राजधानी आयझालच्या 100 किमी दक्षिणेस मध्यवर्ती सेर्शिप जिल्ह्यात आहे. झिओना चाना यांचा जन्म 21 जुलै 1945 रोजी झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी पहिले लग्न केले, त्यांची पत्नी झाथियंगी त्यांच्यापेक्षा तीन वर्ष मोठी होती. आता झिओना यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबातील सदस्य संख्येमुळे हे कुटुंब जगात ओळखले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की या कुटुंबाचा खर्च कसा चालत असेल. तर शेती हा या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय आहे. या कुटुंबास त्यांच्या प्रिय व्यक्तींकडून देणगीदेखील मिळते. एका मुलाखतीत कुटुंब प्रमुख झिओना चाना यांनी सांगितले होते की असे बरेच लोक आहेत जे या कुटुंबावर प्रेम करतात आणि त्यांना मदतही करतात.
या कुटुंबाच्या स्वयंपाकघरात एका दिवसात सुमारे 45 किलो तांदूळ, 25 किलो डाळ, 60 किलो भाज्या, 30 ते 40 कोंबड्या आणि शेकडो अंडी शिजवली जातात. यासह, संपूर्ण कुटुंब दिवसाला 20 किलोपेक्षा जास्त फळे खाते. घराच्या अंगणात हे कुटुंब पालक, कोबी, मिरची, ब्रोकोली अशा अनेक भाज्या पिकवते. होम गार्डनमुळे कुटुंबाचा बराच खर्च वाचला आहे.
मिझोरममध्ये होणाऱ्या निवडणुकीत या कुटुंबाची भूमिका महत्वाची आहे. यामुळेच निवडणुकीच्या वेळी चाना कुटूंबाला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की, हे कुटुंब ज्या पक्षाला समर्थन देईल त्या पक्षाचा विजय जवळजवळ निश्चित आहे.