Pune MHADA: पुण्यात सर्वसामान्यांना मिळणार हक्काचा निवारा: अवघ्या 11 लाखांपासून घरे, म्हाडाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ४,४६२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही सोडत आता २६ नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे.

Pune MHADA Lottery

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना आता १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी व अर्ज करता येणार असून, या योजनेची अंतिम संगणकीय सोडत २६ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल.

आधीच्या वेळापत्रकानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत होती. मात्र, गणेशोत्सव आणि इतर सणांच्या कालावधीत कागदपत्रे गोळा करणे व अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे मंडळाने घेतला आहे.

सदनिकांची विभागणी आणि घरांचे स्वरूप

या सोडतीमध्ये एकूण ४,४६२ सदनिकांचा समावेश असून, त्या विविध योजनांखाली उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना: २ हजार ९७१ सदनिका

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना: १ हजार ४९१ सदनिका

भौगोलिकदृष्ट्या या सदनिकांचे वाटप खालीलप्रमाणे आहे:

पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्र: १,४६८ सदनिका

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) क्षेत्र: १,४०६ सदनिका

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्र: १,५८८ सदनिका

यामध्ये गेल्या दोन सोडतींमध्ये विक्रीविना शिल्लक राहिलेल्या ५५८ सदनिकांचाही समावेश करण्यात आला आहे. १ आरके, १ बीएचके, १.५ बीएचके आणि २ बीएचके अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असलेल्या या घरांच्या किमती सुमारे ११ लाखांपासून ते ६४ लाख रुपयांपर्यंत आहेत.

सुधारित वेळापत्रक: महत्त्वाच्या तारखा

म्हाडा पुणे मंडळाने जाहीर केलेले सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: १५ ऑक्टोबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

ऑनलाइन अनामत रक्कम (EMD) भरण्याची मुदत: १५ ऑक्टोबर (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

RTGS / NEFT द्वारे बँक चलन भरण्याची मुदत: १६ ऑक्टोबर (दुपारी ३ वाजेपर्यंत)

स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्धी: १२ नोव्हेंबर (सायंकाळी ७ वाजता)

दावे व हरकती नोंदवण्याची मुदत: १४ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्धी: २० नोव्हेंबर (सायंकाळी ७ वाजता)

अधिकृत संगणकीय सोडत: २६ नोव्हेंबर (सकाळी ११ वाजता)

विजेत्या अर्जदारांची नावे प्रसिद्धी: २६ नोव्हेंबर (सायंकाळी ६ वाजता)

नागरिकांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (housing.mhada.gov.in) किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागेल. अर्ज करताना अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्र आणि अधिवास दाखला (डोमिसाइल) अचूक अपलोड करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तसेच, कोणत्याही दलाल किंवा अनधिकृत व्यक्तींच्या मध्यस्थीला बळी न पडता थेट अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement