मन की बात: चांद्रयान 2, मेघालय पाणी संवर्धन मोहिमेला नरेंद्र मोदी यांनी दिली कौतुकाची थाप, वाचा काय होता आजचा अजेंडा
तर जलशक्ती जनशक्ती उपक्रमाच्या यशाविषयी माहिती देत त्यांनी मेघालय राज्याचं धोरणाचा खास उल्लेख केला.
लोकसभा निवडणूक पार पडल्यावर पुन्हा एकदा सुरु झालेल्या मन की बात (Mann Ki Baat) सत्रात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज, 28 जुलै 2019 रोजी दुसऱ्यांदा देशवासीयांशी संवाद साधला. यामध्ये अपेक्षेप्रमाणे मोदींनी सुरवातीला चांद्रयान 2 (Chnadryan 2) च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय वैज्ञानिकांचे कौतुक केले, यानंतर यंदाच्या सामाजिक मोहिमेकडे आपला मोर्चा वळवत जलसंवर्धन उपक्रमांविषयी देखील त्यांनी भाष्य केले. यामध्ये हरियाणा (Hariyana)आणि मेघालय (Meghalaya) सरकारच्या हटके उपाययोजनेसाठी त्यांचे खास उल्लेख करण्यात आले. मन की बात च्या आजच्या सत्रात कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली याचा घेतलेला हा आढावा.
चांद्रयान २
चांद्रयान 2 ही पूर्णतः भारतीय रंगात रंगलेली स्वदेशी ढंगाची मोहीम होती, आणि त्याला मिळालेल्या यशाने भारतीय वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे असे मोदी म्हणाले. यंदाचे वर्ष अंतराळातील प्रगतीच्या दृष्टीने भारतासाठी बरच यशस्वी ठरले आहे यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहावी असे म्हणत त्यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिलेल्या.
चांद्रयान 2 प्रश्नमंजुषा
चांद्रयान 2 या मोहिमेच्या प्रक्षेपणावळी जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिकांनी हा अनुभव प्रत्यक्ष बघण्यासाठी बुकिंग केले होते. हीच उत्सुकता लक्षात घेत आज, मोदींनी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेची घोषणा केली. ही एक प्रश्नमंजुषा असेल ज्यात सर्वाधिक गन मिळवणाऱ्या काही निवडक विद्यार्थ्यांना 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चे लँडिंग बघता येणार आहे.
जल नीतीचे कौतुक
जलसंवर्धन उपक्रमासाठी स्वतःची स्वतंत्र जल नीती आखणारे मेघालय हे देशातील पहिले राज्य ठरले आहे यासाठी त्यांचे कौतुक करण्यात आले. हरियाणा राज्यात पाणी रोखून ठेवणाऱ्या पिकांच्य लागवडीस प्रोत्साहन दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हितासोबतच जलसंवर्धनास ही पाठिंबा मिळत आहे. तसेच येत्या काळात देशात सणांचे पर्व सुरु होणार आहेत यानिमिताने अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात येईल, हेच औचित्य साधून पाणी वाचवा मोहिमेचं महत्व लोकांपर्यंत पोहचवावे असे आवाहन मोदींनी केले आहे.
याशिवाय आजच्या ,मन की बात मधून मोदींनी भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीची देखील वाहवा केली. यासोबतच यंदा देशातील काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशावेळी सुद्धा धैर्याने वागणाऱ्या भारतीयांना सलाम असेही मोदी म्हणाले.