Jallianwala Bagh: जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली!
जालियनवाला बाग हत्याकांड घटनेच्या 101 व्या वर्षात या सर्व शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा आजचा दिवस आहे, 1919 साली 13एप्रिल याच दिवशी जालियनवाला बाग (Jallianwala Bagh Massacre) येथे जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून हल्ला गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले होते. आज या घटनेच्या 101 व्या वर्षात या सर्व शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. या शाहिद भारतीयांची हिंमत आणि त्याग वृत्ती ही सदैव स्मरणात राहील, आणि येत्या काळात सुद्धा अशाच प्रकारे लढण्यासाठी प्रेरणा देत राहील असे मोदींनी ट्विट मध्ये लिहिले आहे. मागील वर्षी म्हणजेच या घटनेच्या 100 व्या वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी जालियनवाला बागेतील या हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट दिली होती.
जालियनवाला बाग हत्याकांडाचा इतिहास पाहता 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये बैसाखी सणाच्या निमित्ताने अनेक शीख बांधव जालियनवाला बागेत जमले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक सत्यपाल व सैफुद्दीन किचलूच्या अटकेचा लोकांनी निषेध नोंदवला होता. यावेळी जमावबंदीचा आदेश लागू होता ज्याचे उल्लंघन केल्याचे दिसताच या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर कडून देण्यात आले, त्यानुसार 90 ब्रिटिश सैनिकांनी 10 ते 15 मिनिटांत बंदुकीच्या 1650 गोळ्या झाडल्या. अंदाधुंद गोळीबार सुरू झाल्याने अनेक जण यामध्ये शहीद झाले. तर बचावासाठी धावाधाव करत असताना चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बागेतील खोल विहिरीत उड्या मारल्या होत्या. अमृतसर येथील ब्रिटिश कमिशनरच्या नोंदीनुसार या घटनेमध्ये 484 जण शहीद झाले. त्यापैकी 388 शहिदांची यादी या बागेत आजही पाहायला मिळते.
नरेंद्र मोदी ट्विट
दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमीशन नेमण्यात आले. यामध्ये जनरल डायर दोषी सिद्ध झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले. 1997 मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ भारत दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी या हत्याकांडात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. तर 2013 मध्ये इंग्लंडचे प्रंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सुद्धा जालियनवाला बागेला भेट देत ब्रिटिशांसाठी ही लज्जास्पद घटना असल्याचे म्हणत माफी मागितली होती.