मी खोटं बोलत नाही- दसॉच्या सीईओंचे राहुल गांधींच्या आरोपांवर प्रत्युत्तर
राफेल डिल विषयी दसॉ एव्हिएशनचे सीईओ एरिक त्रपिएर यांनी आज अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
राफेल डिल विषयी दसॉ एव्हिएशनचे सीईओ एरिक त्रपिएर यांनी आज अनेक महत्त्वाचे खुलासे केले. ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी सांगितले की, "अनिल अंबानींच्या कंपनीसोबत जोडण्याचा निर्णय आमचा होता. फायटर प्लेन्स हवे असल्याकारणाने भारतीय हवाईदल या डिलचे समर्थन करत आहे."
राहुल गांधींनी एरिक त्रपिएर यांच्यावर खोटे बोलण्याचे आरोप केले होते. ते देखील एरिक यांनी फेटाळून लावले. यावर ते म्हणाले की, "मी खोटे बोलत नाही. जे मी पूर्वी बोललो होतो किंवा जे वक्तव्य मी पूर्वी केले होते, ते सर्व खरे आहेत. मी एका कंपनीचा सीईओ आहे आणि या स्थानावर असताना तुम्ही खोटे बोलू शकत नाही."
याच महिन्याच्या 2 तारखेला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात ते म्हणाले होते की, "दसॉ एव्हिएशनने राफेल जेट विमान करार करण्यासाठी तोट्यात असणाऱ्या भारतीय कंपनीमध्ये 284 कोटींची गुंतवणूक केली आहे." मात्र राहुल गांधींचे हे आरोप रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने फेटाळून लावले आहेत.
पक्ष आणि त्याच्या अध्यक्षांना राज्यातील विधानसभा निवडणूका आणि इतर निवडणूकांपूर्वी राजकीय लढाईत सातत्याने ओढले जाणे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, असे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या प्रवक्तांनी सांगितले. रिलायन्स एअरपोर्ट डेवलपर्स लिमिटेड (आरएडीएल) मध्ये दसॉच्या गुंतवणूकीचा आणि भारत-फ्रान्सच्या सरकारमध्ये झालेल्या राफेल विमान कराराशी काहीही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.