IPL Auction 2025 Live

Get Fit In 3 Months: 'येत्या 3 महिन्यांत 'फिट' व्हा अथवा निवृत्ती घ्या'; लठ्ठ पोलिसांना चेतावणी, चेक होणार BMI, जाणून घ्या सविस्तर

जी.पी. सिंग पुढे म्हणाले की, ज्यांना हायपोथायरॉईडीझमसारख्या वैद्यकीय समस्या आहेत त्यांना यातून सूट दिली जाईल.

Representative image

आसाम पोलिसांच्या (Assam Police) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लठ्ठ (Obese) पोलिसांना फिट करण्यासाठी एक अभिनव मार्ग शोधून काढला आहे. अधिकाऱ्यांनी लठ्ठ पोलिसांना आपल्या शरीरावरील चरबी कमी करून फिट होण्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली आहे. पोलिसांना या 3 महिन्यात त्यांचे बॉडी मास इंडेक्स (BMI) नियंत्रित करण्याचे आव्हान देण्यात आले आहे, जे असे करणार नाहीत त्यांना व्हीआरएस घ्यावी लागेल. आसाम पोलीस आता प्रोफेशनल पद्धतींद्वारे आपल्या सर्व अधिकाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स तपासणार आहेत.

आसामचे पोलीस महासंचालक (डीजीपी) जी.पी. सिंह यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले, ‘आम्ही आयपीएस आणि एपीएस अधिकाऱ्यांसह सर्व आसाम पोलीस कर्मचार्‍यांना 15 ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांचा वेळ देत आहोत. या काळात त्यांनी त्यांचे वजन कमी करावे. त्यानंतर 15 दिवसांत आम्ही बीएमआयचे मूल्यांकन सुरू करू.’

यामध्ये जे कर्मचारी लठ्ठ श्रेणीत येतात (BMI 30+) त्यांना वजन कमी करण्यासाठी आणखी तीन महिने दिले जातील आणि त्यानंतर त्यांना स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) ऑफर केली जाईल. जी.पी. सिंग पुढे म्हणाले की, ज्यांना हायपोथायरॉईडीझमसारख्या वैद्यकीय समस्या आहेत त्यांना यातून सूट दिली जाईल. डीजीपी म्हणाले होते की 16 ऑगस्ट रोजी बीएमआय रेकॉर्ड करणारे ते पहिले व्यक्ती असतील.

आसाम पोलिसांमध्ये सुमारे 70,000 कर्मचारी कार्यरत आहेत. आसाम पोलिसांच्या एका उच्च अधिकार्‍याने गेल्या आठवड्यात सांगितले, की त्यांनी 650 हून अधिक कर्मचार्‍यांची यादी तयार केली आहे ज्यांना कथितपणे दारूचे व्यसन आहे किंवा ते लठ्ठ आहेत आणि जे कर्तव्यासाठी अयोग्य आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या पुनरावलोकनानंतर त्यांना स्वच्छेने स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल. परंतु मूल्यांकनानंतरही या यादीत ज्यांची नावे दिसतील, परंतु त्यांना व्हीआरएस घ्यायची नाही त्यांना फील्ड ड्युटी दिली जाणार नाही. (हेही वाचा: Rozgar Mela 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 71 हजार उमेदवारांना आज मिळणार नियुक्तीपत्रं)

दरम्यान, एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकत्याच उच्च पोलीस अधिकार्‍यांच्या व्हर्च्युअल बैठकीत पोलीस दलातून अकार्यक्षम लोकांना काढून टाकण्याबाबत भाष्य केले. या लोकांमध्ये मद्यपान करणारे, लठ्ठ कर्मचारी तसेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आसाम पोलीस दलाला उत्तरदायी आणि कृतीभिमुख करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.