घरगुती सिलेंडरचे भाव मार्च मध्ये उतरणार: पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी अलीकडेच केलेल्या दाव्यानुसार, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले दर मार्च महिन्यात उतरणार आहेत.

Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अलीकडेच तब्बल 145 रुपयांची वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार असे दिसत होते, मात्र यामुळे चिंतेत असणाऱ्यांसाठी एक आशा दायी माहिती आता समोर येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी अलीकडेच केलेल्या दाव्यानुसार, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढलेले दर मार्च महिन्यात उतरणार आहेत. प्रधान यांनी स्वामी विवेकानंद विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना "मागील काही महिन्यात एलपीजीचे दर सतत वाढत असल्याचा दावा केला जातोय मात्र यात सत्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने या महिन्यात दर वाढवावे लागले. पण पुढील महिन्यात दर कमी होण्याचे संकेत आहेत."असे सांगितले आहे. जर तुमच्या घरी उशिराने LPG आल्यास तक्रार करा, विक्रेत्याचे कापले जाणार कमिशन

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितल्यानुसार, "मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 144.5 रुपयांची वाढ झाली होती. मात्र देशातील ग्राहकांवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने सिलेंडरवरील अनुदान जवळपास दुप्पट केलं आहे करण्यात आले आहे. तसेच थंडीच्या दिवस एलपीजीची मागणी वाढते, परिणामी या क्षेत्रावरील दबाव वाढतो. या महिन्यात किमती जरी वाढल्या असतील, पण पुढील महिन्यात दर कमी होतील अशी आशा सुद्धा प्रधान यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2020 पासून गॅस सिलेंडरचे भाव स्थिर होते त्यानंतर थेट 12 फेब्रुवारीला नवीन दर लागू करण्यात आले होते, नवीन दर पाहिल्यास, मुंबई (Mumbai) मध्ये प्रति सिलेंडर 145 रुपये , दिल्ली (Delhi) मध्ये 144 रुपये, कोलकाता (kolkata) येथे 149 रुपये तर चेन्नई (Chennai) मध्ये 147 रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. या दर वाढीच्या विरोधात काँग्रेस सहित काही संघटनांनी विरोध केला होता.