AYUSH 64 या कोविड 19 वरील औषध वितरणास गोव्यात सुरूवात

आयुष मंत्रालय कोविड-19 वर औषधासंबंधी सतत प्रयत्नशील आहे अशी माहिती देखील केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.

आयुष 64 औषध | Photo Credits: PIB Mumbai

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Union Minister of State for Defence, Shripad Naik) आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) यांच्या हस्ते आज गोव्यात आयुष 64 औषध वितरणास प्रारंभ करण्यात आला. आयुर्वेद विज्ञानासंबंधीच्या केंद्रीय परिषदेचे डॉ एच.के.गुप्ता आणि आयुष खात्याचे उपसंचालक डॉ दत्ता भट यांची याप्रसंगी उपस्थिती होती. केंद्रीय आयुष मंत्रालय कोविड-19 रुग्णांसाठी औषधांबाबतीत सातत्याने संशोधन करत आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच आयुष 64 औषधाचा प्रारंभ करण्यात आल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. आयुष 64 हे औषध लक्षणे नसलेले, सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या कोविड-19 रुग्णांना देण्यात येते. गोव्यातील नागरिकांनी या औषधाचा लाभ घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे नाईक म्हणाले. AYUSH 64: नक्की काय आहे Covid-19 वर प्रभावी ठरत असलेले आयुष-64 औषध? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम आणि कोणी, कसे व किती दिवस सेवन करावे.

आयुष 64 औषध राज्यातील कोविड रुग्णांना गृह विलगीकरण कीटसोबत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. आयुष 64 हे औषध प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर रुग्णांनी किमान सहा महिने काळजी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयुष 64 औषध घेण्यासाठी रुग्णाच्या प्रतिनिधीने आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आणि आधार क्रमांक देणे आवश्यक आहे.

कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. आयुष मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस), विकसित केलेले आयुष-64 पॉलीहर्बल फॉर्म्युलेशन (एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करून तयार केलेले औषध) हे लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 बाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यात सहाय्यक असल्याचे देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सुरुवातीला हे औषध मलेरियासाठी 1980 साली विकसित केले होते आणि आता पुन्हा कोविड-19 साठी याचा वापर करण्यात आला आहे.