Delhi Crime: दिल्लीच्या एरोसिटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 2 वर्षे राहिला; 58 लाखाचे बिल न भरता पसार झाला, गुन्हा दाखल
प्रेम प्रकाशने दत्ताची रक्कम दुसऱ्या पाहुण्यांच्या बिलात समायोजित करण्याचा प्रयत्न केला होता.
राजधानी दिल्लीतून (Delhi) फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे अंकुश दत्ता नावाची व्यक्ती तब्बल 603 दिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला व आता आपले बिल चुकते न करता पसार झाला आहे. हॉटेल व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला, कारण या व्यक्तीने हॉटेलची तब्बल 58 लाखांची फसवणूक केली आहे. आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. दत्ता याचे हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांशी जुने संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या हॉटेलचे संचालन करणाऱ्या बर्ड एअरपोर्ट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे विनोद मल्होत्रा यांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कलम 408, 420, 468, 471, 120B अन्वये एफआयआर नोंदवला आहे. हॉटेलने आरोप केला आहे की, कर्मचारी प्रेम प्रकाश याच्या मदतीने दत्ताने फसवणुकीचा कट रचला.
हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, मूळचा गुवाहाटी (आसाम) येथील अंकुश दत्ता याने 30 मे 2019 रोजी हॉटेल रोझेट हाऊस ऑफ एरोसिटीमध्ये चेक इन केले होते. त्याला हॉटेलने खोली क्रमांक 437 दिला होता. या खोलीचे रोजचे भाडे 6355 रुपये होते. अंकुश दत्ता दुसर्या दिवशी म्हणजे 31 मे 2019 रोजी हॉटेलमधून चेकआउट करणार होता, परंतु त्याने चेकआउट केले नाही आणि 22 जानेवारी 2021 पर्यंत आपला मुक्काम वाढवला.
हॉटेलचा नियम आहे की, जर एखादा पाहुणे 72 तासांपेक्षा जास्त काळ थांबला असेल आणि त्याने थकबाकी भरली नाही, तर त्याची माहिती तातडीने हॉटेल व्यवस्थापन अधिकाऱ्यांना द्यावी लागले. परंतु प्रेम प्रकाशने तसे केले नाही. उलट हॉटेलचे थकीत भाडे द्यावे लागू नये म्हणून प्रेम प्रकाशने हॉटेलच्या सॉफ्टवेअर सिस्टममध्ये हेराफेरी करून अंकुश दत्ताच्या खात्याबाबत चुकीच्या नोंदी केल्या. (हेही वाचा: UP Shocker: क्रिकेट सामन्यात बाद झाल्यानंतर फलंदाजाने केली बॉलरची गळा दाबून हत्या; आरोपी फरार, Kanpur मधील धक्कादायक घटना)
पोलीस तक्रारीनुसार, हॉटेल मॅनेजरने प्रेम प्रकाश याच्यावर दत्ताचे खाते योग्य दिसण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. प्रेम प्रकाशने दत्ताची रक्कम दुसऱ्या पाहुण्यांच्या बिलात समायोजित करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यासाठी बनावट व खोटी बिले तयार केली, असाही आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.