Bharat Jodo Yatra: श्रीनगर येथे 30 जानेवारी रोजी होणार भारत जोडो यात्रेचा समारोप; 21 पक्ष येऊ शकतात एकाच व्यासपीठावर, कॉंग्रेसने पाठवले निमंत्रण
7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये संपेल, जेव्हा राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवतील.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप 30 जानेवारीला श्रीनगर, काश्मीरमध्ये होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या समारोप कार्यक्रमात देशातील अनेक विरोधी पक्ष एका व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात. यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी बुधवारी (11 जानेवारी) अनेक पक्षांना पत्र लिहिले आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केले की, ‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी 30 जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी 21 समविचारी पक्षांच्या अध्यक्षांना आमंत्रित करणारे पत्र लिहिले आहे.’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रात लिहिले आहे की, कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेने आतापर्यंत 3300 किलोमीटरचे अंतर कापले आहे. या प्रवासात समरसता आणि समतेचा अत्यंत साधा आणि चिरस्थायी संदेश आहे. भारतीयांनी या मूल्यांसाठी शतकानुशतके लढा दिला आहे आणि ते आपल्या संविधानात समाविष्ट आहेत.’
ते म्हणतात, ‘या यात्रेमधील लोक उन्हाळा, हिवाळा आणि पावसात दररोज 20-25 किमी चालत आहेत. त्यांनी या यात्रेचा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचवला आहे. प्रवासाच्या सुरुवातीपासूनच आम्ही प्रत्येक समविचारी भारतीयाला प्रवासात येण्याचे आमंत्रण दिले आहे. राहुल गांधींच्या निमंत्रणावरून अनेक राजकीय पक्षांचे खासदारही वेगवेगळ्या टप्प्यांवर यात्रेत सहभागी होत आहेत. 30 जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला मी तुम्हाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतो.’
ते पुढे म्हणतात, ‘जिथे लोकांचे लक्ष सार्वजनिक प्रश्नांवरून पद्धतशीरपणे वळवले जात आहे, तिथे ही यात्रा एक शक्तिशाली आवाज म्हणून उदयास आली आहे. मला आशा आहे की तुम्ही त्यात सामील व्हाल आणि याचा संदेश अजून मजबूत कराल.’ भारत जोडो यात्रेसाठी काँग्रेसने आमंत्रित केलेल्या पक्षांमध्ये TMC, JDU, SS, TDP, NC, SP, BSP, DMK, CPI, CPM, JMM, RJD, RLSP, HAM, PDP, NCP, MDMK, VCK, IUML, KSM, RSP यांचा समावेश आहे. भारत जोडो यात्रेचा पंजाब टप्पा बुधवारपासून सुरू झाला आहे. (हेही वाचा: लोकांचे लक्ष विचलीत होईल अशी दृश्ये टाळा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दूरचित्रवाहिन्यांना सल्ला)
दरम्यान, 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये संपेल, जेव्हा राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवतील. ही पदयात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधून गेली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2023 09:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

