जम्मू-कश्मीर: नवजात बालक आणि मातेला घरी सुखरुप पोहचवण्यासाठी जवानाची बर्फाच्छादित रस्त्यावरुन 3.5 किमी ची पायपीट (See Pics)

तसंच त्यांच्याबद्दलचा लोकांच्या मनातील आदर अधिकच द्विगुणित झाला आहे.

Indian Army Troops Wade Through Heavy Snow (Photo Credits: ANI)

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) सोपोर (Sopore) येथील सैन्याच्या जवानाचे प्रचंड कौतुक होत आहे. तसंच त्यांच्याबद्दलचा लोकांच्या मनातील आदरही अधिकच द्विगुणित झाला आहे. जम्मू काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे रस्ते बर्फमय झाले आहेत. यातच एक नवजात बालकाला आणि मातेला हॉस्पिटलमधून घरापर्यंत सुखरुप पोहचवण्यासाठी  लष्कराच्या जवानाने मदत केली. एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, सोपोर मधील लष्कराच्या जवानांनी पाझलपोर (Pazalpora) येथील हॉस्पिटलमधील नवजात बालकासह मातेला त्यांच्या घरी दुनिवार (Duniwar) येथे सुखरुप पोहचवले. यासाठी त्यांनी बर्फाने आच्छादलेला 3.5 किमी चा रस्ता चालत पार केला. विशेष म्हणजे बाळाला आणि आईला स्ट्रेचरवरुन नेण्यात येत होते. याचे फोटोज देखील समोर आले आहेत.

जम्मू-काश्मीर येथे प्रचंड थंडी आहे. इतक्या थंडीत स्ट्रेचरवर बाळ आणि मातेले घेऊन चालत 3.5 किमी चालत रस्ता पार करणे कठीण आहे. मात्र जवानाने हे आव्हान अगदी लीलया पार केले. दरम्यान, स्थानिकांनी आणि आरोग्यसेवकांनी जवानांना मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

ANI Tweet:

यापूर्वी अशाच प्रकारची घटना कुपवाड्यातील करळपुरा येथून समोर आली होती. 5 जानेवारी रोजी एका गरोदर महिलेला घेऊन जवानांनी 2 किमी चे अंतर पार करत मु्ख्य रस्त्यापर्यंत आणले होते. त्यानंतर तेथून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

अति बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. 260 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग, काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. मात्र बर्फवृष्टीमुळे सध्या तो बंद ठेवण्यात आला आहे.