आरोग्य सेतू अॅप NIC आणि आयटी मंत्रालयाद्वारे विकसित; RTI च्या नोटीसनंतर केंद्राचे स्पष्टीकरण

तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आता केंद्राकडून याबद्दलचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Aarogya Setu App (Photo Credits: Twitter/@SetuAarogya)

आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅपबद्दलची माहिती इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय (Ministry of Electronics) आणि केंद्रीय माहिती आयोगाला (National Informatics Centre) नसल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच वाद निर्माण झाला होता. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आता केंद्राकडून याबद्दलचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आरोग्य-सेतू अ‍ॅप सार्वजनिक-खासगी सहकार्याने विकसित केल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. (आरोग्य सेतू अॅप कोणी बनवला? याचे उत्तर NIC कडे नाही; RTI कडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस)

MyGov आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, आरोग्य सेतू अॅप राष्ट्रीय माहिती केंद्र आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने खासगी भागीदारीसह विकसित केले आहे. IANS शी बोलताना सिंह यांनी सांगितले की, आरोग्य सेतू अॅप कोणी तयार केला याबाबत कोणताही संभ्रम नाही. राष्ट्रीय माहिती केंद्र आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने खासगी भागीदारीसह हा अॅप विकसित केला आहे. आपल्या देशातील सर्वोत्तम बुद्धीमत्तेच्या लोकांनी हा अॅप विकसित केला आहे.

यासंदर्भात सरकारकडून लवकरच प्रेस रिलीजद्वारे माहिती देण्यात येईल. आरोग्य सेतू अॅप केवळ 21 दिवसांत तयार करण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. कोरोना व्हायरस संकटात स्वतःची सुरक्षा जपण्यासाठी आणि कोविड-19 रुग्ण ट्रॅक करण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. 2 एप्रिल 2020 मध्ये हा अॅप लॉन्च करण्यात आला होता.

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आरोग्य सेतू अॅप बद्दल माहिती देण्यात असमर्थ ठरले आणि त्यानंतर सौरव दास यांच्या एका तक्रारीनंतर हा वाद निर्माण झाला होता.