जयपूरमधील हे हॉस्पिटल रुग्णाची नस पाहून नाही, तर कुंडली पाहून करते उपचार, वाचा सविस्तर...
जयपूरमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झालेले हे रुग्णालय चक्क कुंडली पाहून रुग्णांवर इलाज करते.
ऐकून धक्का बसेल पण हेच सत्य आहे. जयपूरमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झालेले हे रुग्णालय चक्क कुंडली पाहून रुग्णांवर इलाज करते. 'युनिक संगीता मेमोरियल हॉस्पिटल' (Unique Sangeeta Memorial Hospital) असे या रुग्णालयाचे नाव असून काँग्रेस नेत्यांनी ह्या रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधियाही उपस्थित होत्या. येथे आजारांवर इलाज करण्यासाठी आयुर्वेद, योग, ज्योतिष आणि अॅलोपॅथीच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
आपण आजवर अनेकदा ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल सर्वसाधारणपणे रुग्णाचे नाडी परीक्षण करुन किंवा त्याला तपासून त्याच्या आजाराचे निदान केले जाते. मात्र राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील युनिक संगीता मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णाची चक्क कुंडली पाहून त्याच्यावर योग्य तो इलाज केला जातो.
ह्या रुग्णालयाचे सचिव पंडित अखिलेश शर्मा रोज 25 ते 30 रुग्णांची कुंडली पाहतात त्यानंतर आजाराचे योग्य ते निदान करुन त्या दिशेने उपचार सुरु करतात. त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, की "मी रोज 25-30 लोकांची कुंडली पाहतो. आम्ही केवळ आजारांची माहिती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्राची मदत घेत आहोत. बाकी उपचार आम्ही मेडिकल विज्ञानाच्या मदतीनेच करतो. आम्ही असे करण्यामागचे कारण म्हणजे आजाराची योग्य ती माहिती मिळवणे हा आहे."
तर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, रुग्णांवर उपचार हे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे केले जातात. मात्र ह्यात जर ज्योतिषशास्त्राचा समावेश केला तर रुग्ण देखील खूश होतात. जयपूर मधील ब-याच लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असल्यामुळे आम्ही त्याचा उपयोग आमच्या मेडिकल सायन्समध्ये केला आहे. जेणेकरुन रुग्णही आपल्या आजारावर योग्य ते उपचार घेतील.