5-17 वयोगटातील मुलांचे Aadhaar Biometric Update 30 सप्टेंबर पर्यंत मोफत; UIDAI चे पालकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

पाच ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेले आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण ३० सप्टेंबरपर्यंत मोफत राहणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) जाहीर केले आहे. पालक आणि पालकत्व असलेल्यांनी विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

Aadhaar Card | Wikipedia

आधारकार्ड (Aadhaar Card) हे भारतीयांसाठी आवश्यक ओळखपत्रांपैकी एक आहे. अनेक लहान-मोठ्या सरकारी कामांमध्ये आता आधारकार्ड आवश्यक झाले आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील आवश्यक ओळखपत्र आहे. आता 5-17  वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेले आधार बायोमेट्रिक अद्ययावतीकरण (मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट - एमबीयू) 30 सप्टेंबरपर्यंत मोफत राहणार आहे.  युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) ही माहिती देत पालक आणि पालकत्व असलेल्या व्यक्तींना विहित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

पाच आणि पंधरा वर्षांच्या मुलांसाठीही अपडेट अनिवार्य

मुले पाच वर्षांची झाल्यावर आणि पुन्हा पंधरा वर्षांची झाल्यावर त्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करावे, असा सल्ला यूआयडीएआयने पालकांना दिला आहे. "मुले पाच आणि पंधरा वर्षांची झाल्यावर त्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरण पूर्ण करा," असे यूआयडीएआयने समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केले असून ही सेवा 30 सप्टेंबरपर्यंत मोफत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

आधार अपडेट करण्याचे महत्त्व

आधार नोंदी अचूक ठेवणे आणि शालेय प्रवेश, परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच सरकारी योजनांचा लाभ घेताना मुलांना त्यांची ओळख सुलभपणे पडताळता यावी, हा या अद्ययावतीकरणामागील उद्देश आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या आधार नोंदणीवेळी त्यांची जनसांख्यिकीय माहिती आणि छायाचित्र नोंदवले जाते, मात्र फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन नोंदवले जात नाहीत, कारण या वयात ही बायोमेट्रिक वैशिष्ट्ये अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसतात. त्यामुळे मुले पाच वर्षांची झाल्यानंतर त्यांची बायोमेट्रिक माहिती नोंदवणे आणि पंधरा वर्षी ही प्रक्रिया पुन्हा पूर्ण करणे आवश्यक असते, जेणेकरून आधार नोंदी अद्ययावत राहतील.

व्यापक सहभागासाठी शुल्कमाफी

अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी यूआयडीएआयने १ ऑक्टोबर २०२५ पासून सात ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाचे शुल्क माफ केले होते. सध्याची मोफत सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. नक्की वाचा: Aadhaar Validity Check: तुमचे आधार कार्ड सक्रिय आहे की नाही? घरबसल्या ऑनलाइन तपासा आधार कार्डची वैधता.  

पालकांना आवाहन

पालक आणि पालकत्व असलेल्या व्यक्तींनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि जवळच्या आधार केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. भारतीय रहिवाशांना ओळख पडताळणीसाठी दिला जाणारा बारा अंकी आधार क्रमांक सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement