सलग 7 व्या महिन्यात GST Collection 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे, अर्थ मंत्रालयाची माहिती
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन 1.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढले आहे.
महामारीच्या प्रभावातून बाहेर पडल्यानंतर सरकारच्या उत्पन्नात स्थिरता दिसू लागली आहे. सप्टेंबरमध्ये, सलग 7 व्या महिन्यात, जीएसटी संकलन (GST Collection) 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) आज ही माहिती दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलन 1.47 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढले आहे. यासोबतच सप्टेंबर महिन्यात ई-बिल आणि ई-इनव्हॉइसची संख्या 11 दशलक्ष पार केली आहे. एप्रिलमध्येच, एकूण जीएसटी संकलन 1.67 लाख कोटी रुपये होते, जे आजपर्यंतची विक्रमी पातळी आहे.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात जीएसटीमधून एकूण महसूल 1,47,686 कोटी रुपये झाला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा 8वा महिना आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. या संकलनात CGST रु. 25271 कोटी, SGST रु. 31813 कोटी, IGST रु. 80464 कोटी आणि उपकर रु. 10137 कोटी आहे. सप्टेंबर महिन्यातील एकूण संकलन मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 26 टक्क्यांनी अधिक आहे. हेही वाचा PM Modi On 5G Service: पंतप्रधान मोदींकडून भारतात 5G सेवा सुरू, वाचा याप्रसंगी केलेल्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
सप्टेंबरमध्येच एका दिवसात 49453 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे, जे कोणत्याही दिवशी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे संकलन आहे. राज्यवार जीएसटी संकलनावर नजर टाकल्यास बिहारमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 67 टक्के वाढ झाली आहे. नागालँडमध्ये 61 टक्के वाढ झाली आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. जिथे महिनाभरात 21403 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.
एप्रिलमध्ये जीएसटी संकलन विक्रमी रु. 1,67,540 कोटींवर पोहोचल्यावर या आर्थिक वर्षाची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली. त्याच वेळी, मे महिन्यातील संकलन 1,40,885 कोटी रुपये होते, जे या आर्थिक वर्षातील सर्वात कमी आकडा आहे. जून महिन्यात 56 टक्के वाढीसह संकलन 1,44,616 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनमध्ये सर्वात वेगवान वाढ झाली. जुलैमध्ये 1,48,995 कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 1,43,612 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.