मुंबई: मुलगी वडीलांना सिनिअर; एकाच कॉलेजमध्ये शिकतात बाप-लेक; कॅम्पससह सोशल मीडियावरही चर्चा
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay) नावाच्या फेसबुक पेजवर विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने आपली कहाणी शेअर केली आहे.
मुंबई (Mumbai) येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा आहे. हे दोन विद्यार्थी म्हणजे चक्क वडील आणि मुलगी आहेत. यात विशेष असे की, मुलगी वडीलांना सिनिअर आहे. होय, वाचून काहीसे आपल्याला धक्कादायक वाटेलही कदाचित. पण, हे खरे आहे. वडील-मुलीच्या या जोडीची कॉलेज कॅम्पस आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay) नावाच्या फेसबुक पेजवर विद्यार्थिनी असलेल्या या मुलीने आपली कहाणी शेअर केली आहे.
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' फेसबुक पेजवर आपली कहाणी सांगताना या मुलीने म्हटले आहे की, वकिलीची पदवी घ्यावी ही वडीलांची बालपणापासूनची इच्छा होती. परंतू, परिस्थितीमुळे त्यांना आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही. ते एका कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करु लागले.
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' फेसबुक पेजवरील पोस्ट
पुढे ही मुलगी म्हणते की, मी जेव्हा शिक्षण सुरु केले तेव्हा माझ्या अभ्यासक्रमाबद्दल वडीलांना उत्सुकता असायची. माझा क्लास, विषय आणि तर सर्व गोष्टींबाबत ते मला नेहमी विचारायचे. वडीलांची ही उत्सुकता पाहून कुटुंबियांनी निर्णय घेतला की, त्यांना दुसऱ्यांदा कॉलेजला पाठवायचे. त्यांनीही कुटुंबीयांचा शब्द प्रमाण मानत खरोखरच कॉलेजला कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. (हेही वाचा, मध्य प्रदेश: दारुच्या नशेत असलेल्या शिक्षकाने स्वत: आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा घातला गणवेश, पाहा व्हायरल व्हिडिओ (Video))
'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' फेसबुक पेजवर ही मुलगी म्हणते, मी आणि माझे वडील आता एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण, मजेची गोष्ट अशी की, कॉलेजमध्ये मी वडीलांना सिनिअर आहे. तर, माझे वडील मला ज्युनीअर. फेसबुक पेजवरील ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत या पोस्टला 1200 पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहे.