जे स्वत: जामीनावर फिरत आहेत, ते मोदींना प्रामाणिकपणाचे प्रणाणपत्र काय देणार?; नरेंद्र मोदींचे राहुल-सोनिया गांधींवर टीकास्त्र
या वेळी आपल्या भाषणातून मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयावर केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले.
छत्तीसगढ विधानसभा निवडणूक: एका निवडणूक सभेदरम्यान आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेला या भाषणातून मोदींनी प्रत्त्युत्तर दिले. नोटबंदीमुळे ज्यांच्या खोट्या कंपनीचा पर्दाफाश झाला. तसेच, जे आई आणि मुलगा पैशांच्या अफरातफरीमध्ये जामीनावर फिरत आहेत ते आता मोदींना प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र देणार काय, असा टोला मोदींनी राहुल आणि सोनिया यांना लगावला. छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आयोजित प्रचारसभेत मोदी बोलत होते. या वेळी आपल्या भाषणातून मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयावर केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले.
या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, 'लोक मला विचारतात सरकारं आगोदरही होती. पण, आपण आगोदरच्या सरकारच्या तुलनेत अधिक काम कसे करता? इतके पैसे आणता कोठून? अनेकांना प्रश्न पडतो की, मोदी पैसे कुठून आणतात? पण, मी सांगतो की, हे पैसे आपलेच आहेत. आगोदर हे रुपये काहींच्या बिछान्याखाली लपवलेले होते. कोणाच्या गाद्यांमध्ये भरलेले होते. तर, कोणाच्या कपाटात. पण, नोटबंदीमुळे सर्वांनाच बाहेर यावे लगले. माझे सरकार हेच पैसे खर्च करण्यासाठी काम करत आहे', असेही मोदींनी या वेळी सांगितले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, 'या देशात शक्तीची कमी नाही. टॅलेंटचीही कमी नाही. पण, आगोदर देशातील पैसा इतर ठिकाणीच जात होता. काँग्रेसचेच एक प्रधानमंत्री, तिसऱ्या पिढीच्या पंतप्रधानांनी (राजीव गांधी) सांगितले होते की, राजधानी दिल्लीतून रुपया निघतो. पण, जनतेपर्यंत १५ पैसेच पोहोचतात. हा कोणता हात होता जो ८५ पैशांवर डल्ला मारत होता. हा कोणता हात होता जो रुपयाला १५ पैसे बनवत होता. नोटबंदीनंतर हाच पैसा बाहेर निघाल्याचे मोदींनी सांगितले.' (हेही वाचा, 'भाजपप्रणीत एनडीएला रोखण्यासाठी सेक्युलर पक्षांनी एकत्र यावे, काँग्रेसने मदत करावी')
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ज्यांना भ्रष्टाचाराशिवाय काहीही करता येत नाही. करता आले नाही. ते लोक आज टीका करत आहेत. पण, आम्हाला विकासाच्या मार्गाने चालायचे आहे. कधी स्वच्छ भारताची खिल्ली उडवणे, कधी पर्यटनाची खिल्ली उडवणे असे प्रकार ही मंडळी करत आहेत. पण, आमचा उद्देश मुलांना शिक्षण, युवकांना नोकरी, शेतकऱ्यांना पाणी आणि सिंचन आदी गोष्टींचा विकास करणे आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.