Balapur Ganesh Famous Laddu: बाळापूर गणेशच्या प्रसिद्ध 21 किलोच्या लाडूचा लिलाव, तब्बल 24.60 लाखांची लागली बोली
गेल्या वर्षी लाडूची किंमत 18.90 लाख रुपये होती. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की लाडू त्यांच्यासाठी नशीब, आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी आणतात.
हैदराबादमध्ये (Hyderabad) शुक्रवारी झालेल्या लिलावात बाळापूर गणेशच्या प्रसिद्ध 21 किलोच्या लाडूचा (Balapur Ganesh Famous Laddu) 24.60 लाख रुपयांना लिलाव झाला. स्थानिक व्यापारी व्ही.लक्ष्मी रेड्डी यांना लिलावात हे लाडू मिळाले. गेल्या वर्षी लाडूची किंमत 18.90 लाख रुपये होती. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की लाडू त्यांच्यासाठी नशीब, आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी आणतात. मूर्ती विसर्जनासाठी नेण्यापूर्वी लिलाव करण्यात आला. दरम्यान, शहरात गणेशमूर्तींचे भव्य विसर्जन सुरू असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विसर्जनाचा कार्यक्रम शनिवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
पावसाच्या सरी कोसळत असतानाही हा कार्यक्रम धार्मिक उत्साहात आणि थाटामाटात आयोजित करण्यात आला आहे. तेलंगणाचे डीजीपी महेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी हैदराबाद, सायबराबाद आणि रचकोंडा या तीन पोलीस आयुक्तांमध्ये 35,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हेही वाचा Anant Chaturdashi 2022: गणपती विसर्जनापूर्वी थायलंडच्या नागरिकांकडून जुहू बिचवर गणेशपूजा
ते म्हणाले की, राज्यभरातील दहा लाख सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे विसर्जन मिरवणुकांवर लक्ष ठेवले जात आहे. राज्य सरकारने शुक्रवारी शहर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, बाळापूर ते हुसेन सागर या 19 किमीच्या मिरवणुकीच्या मार्गावर विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहर पोलिस प्रमुखांनी सांगितले होते की, यावर्षी शहरात सुमारे 9,523 मूर्ती बसविण्यात आल्या. या सर्वांचे शुक्रवार आणि शनिवारी विसर्जन होणार आहे.