CAA: 'आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे?' शशांक केतकर चा नेटकऱ्यांना सवाल

आणि (Shashank Ketkar on CAA) आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे? असा सवाल त्याने फॅन्सना विचारला आहे.

Shashank Ketkar (Photo Credits: Facebook)

Shashank Ketkar On CAA: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने CAA (Citizen Amendment Act) या नव्या कायद्याबद्दल देशभरातील अनेक स्तरांवरून त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे तर काहींनी हा कायदा स्वीकारला आहे. विकी कौशल, फरहान अख्तर आणि अनेक बॉलीवूड स्टार्सनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मग मराठी कलाकार यात मागे कसे राहतील? मराठीतील चॉकलेट बॉय अशी ज्याची ओळख आहे, अशा शशांक केतकर याने CAA कायद्याबद्दल व त्याला विरोध म्हणून होणाऱ्या आदोलनांबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शशांकने त्याच्या फेसबुकवर या संबंधित एक पोस्ट लिहिली आहे. आणि (Shashank Ketkar on CAA) आपण भारताचे नागरिक आहोत, हे जर सिद्ध करावं लागणार असेल तर प्रॉब्लेम काय आहे? असा सवाल त्याने फॅन्सना विचारला आहे.

‘एकीकडे भारताची लोकसंख्या खूप आहे, राहायला जागा नाही, म्हणून आपण रडायचं आणि दुसरीकडे इतकी वर्ष चालत आलेली घुसखोरी थांबवण्यासाठी काही नियम केले तर त्याला विरोध करायचा! हा प्रकार थांबला पाहिजे.’ असं शशांकने त्याच्या पोस्ट मधून लिहिलं आहे.

तसेच दिल्लीतील जामिया मिलिया या विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत शशांक लिहितो, ‘दिल्लीत घडलेला प्रकार खेदजनकच आहे, कुठलीही हिंसा वाईटच पण चुकीच्या माहितीचा प्रसार करून लोकांना घाबरवणे हे त्याहून वाईट. हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजेत. आपण भारतीयांनीच आपापसात भांडून काहीही हाती लागणार नाहिये.’

शशांकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी शशांकच्या विचारांना विरोध दर्शवत त्याला ट्रोल केले आहे तर काहींनी त्याला प्रतिसाद दर्शवला आहे.

Citizenship Amendment Act: काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019?

दरम्यान, शशांक केतकर हा झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाला. सध्या तो कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.