Bigg Boss Marathi 2 स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश?
बिग बॉस मराठी 2 मधील चर्चित आणि वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे.
बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) मधील चर्चित आणि वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. आज ते बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील आणि रविवारी प्रसारीत होणाऱ्या एपिसोडमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतील. यापूर्वी अभिजीत यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेशाबाबत साशंकता होती. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आता ते बिग बॉसच्या घरात पुन्हा जाणार असल्याचे समजते आहे.
चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी थेट बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांचे खंडणी प्रकरणही समोर आले. तसंच त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. (Bigg Boss Marathi 2 चा स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना पोस्टमन मारहाण प्रकरणी जामीन मंजूर, तर खंडणी प्रकरणासंदर्भात उद्या होणार कोर्टात सुनावणी)
अभिजीत बिचुकले हे घरातील एकंदरीत वावर, बोलणे, राहणीमान आणि काही खास मैत्रिणींशी असलेली सलगी यामुळे कायम चर्चेत राहिले आहेत. त्याचबरोबर वादग्रस्त विधान, अपशब्दांचा सतत वापर करणं, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत. यावरुन महेश सरांकडून त्यांना वारंवार ताकीद मिळाली आहे. (Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव)
बिग बॉसच्या घरातील त्यांची रिएन्ट्री पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. बिचुकले यांचा अंदाज बदलेला असेल की अधिकच तोऱ्हात ते वावरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यापूर्वी पराग कान्हेरे, शिवानी सुर्वे हे स्पर्धक घराबाहेर पडले होते. त्या दोघांनीही पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. मात्र पराग दुसऱ्याच आठवड्यात पुन्हा घराबाहेर पडला. आता अभिजीत बिचुकले हे बिग बॉसच्या घरात रिएन्ट्री करणारे तिसरे स्पर्धक ठरणार आहेत.