Swarajyarakshak Sambhaji: रायगडाचे वैभव गेले; पुतळाबाईंच्या सती जाण्याने स्वराज्यावर दुःखाची छाया
त्यांनी या विधीची सर्व तयारीही करवून घेतली आहे, मुहूर्त ठरला आहे, सारी सौभाग्यलेणी लेवून, महाराजांचे जोडे हातात घेऊन त्या तयारही आहेत. मात्र दुसरीकडे शंभूराजे कासावीस झाले आहेत
Swarajyarakshak Sambhaji Episode 30 जानेवारी, 2019: स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेत, कारभाऱ्यांच्या निवाड्यानंतर स्वराज्यावर कोसळलेली आपत्ती म्हणजे पुतळाबाईसाहेबांचे सती जाणे. शंभूराजे रायगडावर परत आले, निवाडा पार पडला, सर्व काही स्थिरस्थावर झाले आहे असे लक्षात येताच पुतळाबाईसाहेब सती जाण्याचा विचार करतात. एखाद्या बाणाप्रमाणे हे विचार शंभूराजांच्या काळजावर वार करतात. ज्या आईने आपल्याला वाढवले, लहानाचे मोठे केले, जिने आपल्याला सर्व क्षणी साथ दिली अशा आईला जिवंतपणी अग्नीत प्रवेश करू द्यायचा ही कल्पनाही शंभूराजेंना हादरवून टाकते.
परवाच्या भागात (29 जानेवारी) पुतळाबाईंनी सती जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी या विधीची सर्व तयारीही करवून घेतली आहे, मुहूर्त ठरला आहे, सारी सौभाग्यलेणी लेवून, महाराजांचे जोडे हातात घेऊन त्या तयारही आहेत. मात्र दुसरीकडे शंभूराजे कासावीस झाले आहेत. पुतळाबाईंनी आपला निर्णय बदलावा यासाठी ते त्यांना सर्वोतोपरी समजावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना भूतकाळातले दाखले देतात. जुन्या गोष्टींच्या आठवणी सांगतात. आईची महती वर्णन करतात. हात जोडतात, विनवणी करतात. मात्र पुतळाबाई आपल्या निर्णयावर ठाम असतात. त्यावेळी शंभूराजे त्यांना महाराजांची शपथ घालून अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेवटी एका सतीच्या इच्छेपुढे नियतीही हात टेकते. शंभूराजे शेवटचा प्रयत्न म्हणून पुतळाबाईंच्या पायाशी बसून त्यांची मनधरणी करत असतात, आणि कोणालाही न कळू देता राणीसाहेबांचे प्राण महाराजांच्या पायाशी विलीन होण्यास निघून जातात.
पुतळाबाई आता अनंतात विलीन झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण रायगड दुःखी झाला आहे, सुना झाला आहे. शंभूराजे, राजाराम महाराज यांचे अश्रू थांबायचे नाव घेत नाहीत. संभाजी राजांना जुन्या आठवणी हैराण करत आहेत. पुतळाराणीसाहेबांसोबत व्यतीत केलेले एक एक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहत आहेत. कवी कलशांनी ही दुःखाची खबर सर्वांना पाठवली आहे. शंभूराजांच्ये दुःख कमी व्हावे यासाठी ते दानधर्म करावा, तीर्थक्षेत्री जावे, देवी देवतांचे दर्शन घ्यावे अशी विनंती करतात. (हेही वाचा : रायगडावर सती गेलेल्या एकमेव पत्नी आणि स्त्री म्हणजे वात्सल्याचा महामेरू ‘पुतळाबाई साहेब’)
इकडे येसूबाईही दुःखाने कोलमडून गेल्या आहेत. पुतळाबाई आजही आपल्यातच आहेत असा त्यांना भास होत आहे. त्यांनाही साऱ्या जुन्या आठवणी आठवत आहेत. धराऊही त्यांच्या एक एक आठवणी सांगतात. पुतळाबाईंचा स्वभाव, त्यांचे विचार, त्यांचे वागणे याचे गोडवे गात दोघींच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत आहे. मात्र आता रायगडाला, घरातल्या मंडळींना येसूबाईंनीच सांभाळायला पाहिजे असा सल्ला धाराऊ देतात.
राजाराम महाराज शंभूराजांना भेटायला त्यांच्या महाली येतात. डोळ्यात पाणी घेऊन ते पुतळाबाई आणि महाराजांची आठवण येत असल्याची सांगतात. सध्या गडावर जे काही चालले आहे ते सर्व ठीक होईल का नाही ? असा सवाल ते पुसतात. त्यावर शंभूराजे त्यांना चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल असे सांगतात. इतक्यात सकवारबाई शंभूराजांना सर्वांना आधार देण्याचे सांगतात. तिकडे येसूबाई आणि धाराऊही सोयराबाईंना पुढाकार घेऊन सर्वांना धीर देण्याचे सांगतात. शंभूराजे सोयराबाईंच्या महाली जेवणाचा थाळा घेऊन येतात. सर्वांनी दोन घास खाऊन घेण्याची विनंती करतात. शेवटी शंभूराजेच सर्वांना घास भरवून सर्वांनी आता खेळीमेळीने राहण्यास सांगतात. पुतळाबाईंच्या जाण्याने आता रायगड कसा सावरेल हे येणाऱ्या भागात समजेल.