लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा; लवकरच मिळणार डिस्चार्ज

मागील दोन दिवसांपासून लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचं समजल्यापासून अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली होती.

Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. आज मंगेशकर कुटूंबीयांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची तब्येत स्टेबल आहे. मागील दोन दिवसांपासून लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचं समजल्यापासून अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली होती. त्या चाहत्यांचे आणि हिंतचिंतकांचे यावेळेस आभार मानण्यात आले आहेत. तसेच लता मंगेशकर यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांनी यंदा वयाची नव्वदी पार केली आहे. वयोमानानुसार सध्या लता मंगेशकर गायनक्षेत्रापासून लांब आहेत. सध्या मागील दोन दिवसांपासून फुफ्फुसांमध्ये संसर्गामुळे श्वसनाला त्रास होत असल्याची लता मंगेशकर यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना ब्रीज कॅन्डीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगेशकर कुटुंबीयांकडून लता मंगेशकर यांच्या हितचिंतकांचे आभार मानताना कुटुंबाच्या प्रायव्हसीबद्दल आदर राखल्याने आभार मानण्यात आले आहेत.

ANI Tweet

लता मंगेशकर या मंगेशकर भावंडांमधील सर्वात मोठ्या आहेत. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी लता मंगेशकर यांच्या वडिलांचे म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले आणि घराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यानंतर त्यांनी मराठी, हिंदी सह भारतीय भाषांमध्ये पार्श्वगायनाला सुरूवात केली. त्यांच्या समधूर आवाजाने सार्‍या जगाला भुरळ पाडली आहे.