93rd Academy Awards: 'ऑस्कर्स अवॉर्ड्स 2021' मध्ये मतदानासाठी 819 पाहुण्यांची यादी जाहीर; भारतामधील हृतिक रोशन, आलिया भट्ट यांचा समावेश

भारतामध्ये एकीकडे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा वाद सुरु असताना, हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांना, सिनेमाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित असा ऑस्कर पुरस्कार देणारी संस्था,

Alia, Hrithik, Neeta Lulla among the new Oscar Members (Photo Credits: Instagram)

‘ऑस्कर पुरस्कार’ (Oscar Awards) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. भारतामध्ये एकीकडे बॉलीवूडमधील घराणेशाहीचा वाद सुरु असताना, हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांना, सिनेमाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित असा ऑस्कर पुरस्कार देणारी संस्था, ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अॅण्ड सायन्स’च्या (Academy of Motion Picture Arts and Sciences) संस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. अकादमीने मंगळवारी नवीन आमंत्रितांची यादी प्रसिद्ध केली. या संस्थेचे हे सदस्यता स्वीकारल्यानंतर, पाहुण्यांना 93 व्या अकादमी पुरस्कारां (93rd Academy Awards) मध्ये मतदानाचा विशेषाधिकार प्राप्त होईल.

The Academy Tweet -

819 निमंत्रितांच्या यादीमध्ये, हृतिक रोशन आणि आलिया भट्ट यांच्यासह डिझाइनर नीता लुल्ला, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स निष्ठा जैन आणि अमित मधेसिया, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत आणि टेस जोसेफ, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर्स विशाल आनंद आणि संदीप कमल, चित्रपटाचे संगीतकार नैनीता देसाई यांचा समावेश आहे. सध्या तरी अकादमी पुरस्कारांचा कार्यक्रम 25 एप्रिल 2021 रोजी निश्चित करण्यात आला आहे. अकादमी पुरस्कारांचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, 'मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये या सर्व मान्यवर लोकांचे स्वागत करताना अकादमीला आनंद होत आहे. आम्ही नेहमीच अशी कौशल्ये समाविष्ट केली आहे, जी आमच्या जागतिक चित्रपट समुदायाच्या समृद्ध विविधतेला दर्शवतील.'

मागच्या वर्षी आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा चित्रपट ऑस्करच्या विदेशी भाषा श्रेणीसाठी भारतामार्फत पाठवण्यात आला होता. अकादमीने जारी केलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये आलियाच्या राजी आणि गली बॉय या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. तर ऋतिक रोशनच्या सुपर 30 आणि जोधा अकबर याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, आतापर्यंत ऑस्कर पुरस्कारांमध्ये केवळ एका वर्षाच्या चित्रपटांना नामांकन देण्यात आले होते, परंतु सद्यस्थिती लक्षात घेता पुढील वर्षाच्या पुरस्कारांमध्ये 2020 पासून फेब्रुवारी 2021 अखेरपर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी नामांकन दिले जाईल. याशिवाय थिएटर बंद असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही नामांकन देण्यात येणार आहे.